मुंबई - कॉमेडियन शाम रंगीलाने राजस्थानमधील एका पेट्रोल पंपावर व्हिडिओ बनवला होता. आपल्या सायकलसह त्याने पेट्रोल पंपावर जाऊन इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. मोदी सरकारवर टीका करतानाचा हा व्हिडिओ असून नेहमीच्या स्टाईलने त्याने विडंबन केले आहे. व्हिडिओच्या शेवटी तो पेट्रोलचे भाव वाढल्याने आता पेट्रोल परवडत नसून आपण सायकलने प्रवास करत असल्याचं दिसून येतंय. शाम रंगीलाच्या या व्हिडिओला पेट्रोल पंपमालकाने आक्षेप घेत पोलिसात धाव घेतली आहे.
मेरे प्यारे देशवासियों, राजस्थान के श्री गंगानगर के जनता का सीना चौडा हो गया है, यहाँ पर पेट्रोल की किंमत 100 रुपये छु गई है. आझाद भारत के इतिहास मे एैसी कोई भी सरकार नही आयी थी, जो पेट्रोल को उसकी असली किमत दिला दे. पेट्रोल को उसका हक हमने दिलवाया है... या शब्दांसह कॉमेडियन आणि मोदींच्या आवाजाची मिमिक्री करणारा कलाकार शाम रंगीला याने पेट्रोल पंपासमोर एक तयार केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्याचं काम रंगीलाने केले होतं. मात्र, शाम रंगीलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
गंगानगर शहराच्या हनुमानगर रोडवरील हा पेट्रोल पंप असून एका खासगी कंपनीच्या मालकीचा आहे. येथील पंपावरच शाम रंगीलाने व्हिडिओ शूटींग केले आहे. या पेट्रोल पंपाचे संचालक सुरेंद्र अग्रवाल यांनी यासंदर्भात आक्षेप घेत, पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच, शाम रंगीलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. संचालकाने कंपनीच्या आदेशानुसार दबावातून हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. शाम रंगीला याने पत्रकार असल्याचं सांगत मला फोन केला, त्यानुसार 17 फेब्रुवारी रोजी 5.30 ते 6 वाजण्याच्या सुमारास काही जणांसह पेट्रोल पंपावर आला. त्यावेळी, गर्दी असल्याने कर्मचाऱ्यांनीही पाहिलं नाही. याची दखल घेत, कंपनीकडून दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं.
दरम्यान, मी व्हिडिओ बनवून कुठलाही गुन्हा केला नाही. लोकांसमोर परिस्थिती मांडली आहे, इंधन दरवाढीबद्दल सांगितलं आहे. केवळ, सरकारने दखल घेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरापासून थोडासा दिलासा द्यावा, या हेतुने हा व्हिडिओ बनविल्याचे शाम रंगीला याने म्हटले. तसेच, केवळ तक्रार दाखल झाली आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय करणार ते विचार करु, असेही रंगीलाने म्हटले.