प्रकाश वराडकर -रत्नागिरी -कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी १० जून पासून सुरू झाली असून, हे वेळापत्रक येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. अनेक गाड्यांच्या वेळेत १ ते दीड तासाने बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पावसाळी धोका लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा वेग ११० वरून आता ७५ किलोमीटर प्रतितासावर आणण्यात आला आहे. त्यामुळे मडगाव ते मुंबई हे अंतर पार करण्यासाठी आता तब्बल साडेबारा तासांचा वेळ लागत आहे. मान्सूनव्यतिरिक्त पनवेल ते मडगाव हे अंतर साडेआठ तासात पार केले जात होते. आता या अंतरासाठी ११ तास लागत असून, प्रवासाचा वेळ वाढला आहे. रत्नागिरीतून मडगावला जाण्यासाठी उन्हाळी-हिवाळी हंगामात साडेतीन तासांचा वेळ लागत होता. पावसाळ्यात हा वेळ दीड तासाने वाढला आहे. त्यामुळे आता याच अंतरासाठी ५ तास लागणार आहेत. रत्नागिरी ते पनवेल या अंतरासाठी कोकण रेल्वेमार्गावरून जाण्यासाठी रेल्वेला याआधी ५ तास लागत होते. पावसाळी वेळापत्रक व वेग कमी केल्याने याच अंतरासाठी तासभर अधिक वेळ लागणार आहे. पनवेल ते मुंबई (दादर/शिवाजी टर्मिनस/कुर्ला टर्मिनस) या अंतरासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागत होता. त्यातही आता अर्धा ते १ तासाने वाढ होत आहे. रोहा ते ठोकूरपर्यंत सर्वसाधारणपणे ७५ किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार असली तरी मार्गावरील काही दुर्गम नसलेल्या टप्प्यात गाडीचा वेग ताशी ८० किंवा ९० किलोमीटर ठेवण्यात आला आहे. अतिवृष्टीत कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या पंधरा वर्षांच्या काळात अनेकदा ठप्प झाली होती. (प्रतिनिधी)अतिवृष्टीत रेल्वेचा वेग आणखी मंदावणार?कोकण रेल्वेने पावसाळी नियोजन म्हणून दरवर्षीप्रमाणे रेल्वेचा वेग कमी केला आहे. त्यामुळे पाऊस नियमित पातळीवर असताना मडगाव - मुंबई अंतरासाठी साडेबारा तासांचा वेळ लागणार आहे. परंतु अतिवृष्टी झाल्यास रेल्वेचा वेग आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कोकणातील एखाद्या भागात अतिवृष्टी झाली व रुळांवर पाणी साचले तर गाड्या थांबवण्याची वेळही कोकण रेल्वेवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा हा वेळ आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मडगाव-मुंबई प्रवास साडेबारा तासांचा
By admin | Published: June 12, 2015 10:54 PM