मढ मनोरी-गोराई-भाईंदर किनार्यावरील रो-रो फेरी सेवा लवकर कार्यान्वित होणार; गोपाळ शेट्टी यांना पत्र
By मनोहर कुंभेजकर | Published: March 3, 2023 07:08 PM2023-03-03T19:08:20+5:302023-03-03T19:08:41+5:30
रो-रो फेरी आणि जलमार्ग वाहतूक, प्रवासाचा वेळ कमी करून, वाहतुकीच्या खर्चात सुधारणा करून आणि वाहतुकीच्या पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत प्रदूषण कमी करून अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
मुंबई: मढ मनोरी-गोराई-भाईंदर किनार्यावरील रो-रो फेरी सेवा लवकर कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर खूप कमी होणार असून इंधनाची आणि नागरिकांच्या वेळेची देखिल बचत होणार आहे. मढ-मनोरी-गोराई-भाईंदर किनाऱ्यापासून सुरू होणारा मोठा सागरी किनारा आहे. लोकल ट्रेनशिवाय या प्रदेशाशी कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही.
रो-रो फेरी आणि जलमार्ग वाहतूक, प्रवासाचा वेळ कमी करून, वाहतुकीच्या खर्चात सुधारणा करून आणि वाहतुकीच्या पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत प्रदूषण कमी करून अत्यंत फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाशी गेली अनेक वर्षे या मार्गावर रो रो सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.तसेच त्यांनी सर्बानंद सोणावाल यांना दि, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र लिहून मढ-मनोरी-गोराई-भाईंदर किनारपट्टीवर लवकरात लवकर रो-रो फेरी सेवा कार्यान्वित करण्यात यावी अशी विनंती केली होती.
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने देशात रो-रो फेरी आणि जलमार्ग वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक इकोसिस्टम विकसित करण्यास सुरुवात केली आहे. जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने १९०० कोटी रुपयांच्या एकूण ४५ प्रकल्पांना आर्थिक मदत केली आहे. ही योजना मंत्रालयाच्या सागरमाला कार्यक्रमांतर्गत येते.त्यामुळे मढ मनोरी-गोराई-भाईंदर किनार्यावरील रो-रो फेरी सेवा लवकर कार्यान्वित करा अशी मागणी असे खासदार शेट्टी यांनी पत्राद्वारे केली होती. अखेर खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुरव्याला यश येत आणि त्यांच्या पत्राची दखल घेत दि, २२ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोणावाल यांनी उत्तर मुंबईत रोरो सेवा लवकर सुरू करण्या संदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
महाराष्ट्रात सदर ३१ पकल्पांसाठी ९३५ कोटी रुपयांची तरतूद पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयतर्फे, करण्यात आली आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अंतर्गत या योजनेचे काम प्रगतीपथावर असून मार्वे तसेच भायंदर येथील रोरो जेट्टीचे काम संपले आहे. आणि मनोरी तसेच वसई जेट्टी चे काम चालू आहे. त्याच प्रमाणे गोराई, बोरिवली येथील रोरो जेट्टीच्या कामा संदर्भात वन विभागाशी प्रक्रिया सुरू आहे असे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोणावाल यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.