मढ ग्रामस्थांना भर वस्तीत हॉस्पिटल नको!
By मनोहर कुंभेजकर | Published: February 22, 2024 09:56 PM2024-02-22T21:56:22+5:302024-02-22T21:56:37+5:30
पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून दुसऱ्या सरकारी जागेवर स्थलांतरीत करू, कोळीवाड्यातील एकाही घराला हात लावू देणार नाही-खासदार गोपाल शेट्टी यांची ग्वाही.
मुंबई- मढ ग्रामस्थांना भर वस्तीत हॉस्पिटल नको असून पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलून दुस-या सरकारी जागेवर स्थलांतरीत करू.कोळीवाड्यातील एकाही घराला हात लावू देणार नाही अशी ग्वाही खासदार गोपाल शेट्टी यांनी दिली. मोजे मढ कोळीवाडा, तहसील अंधेरी, मुंबई सिटीएस. क्र. १९७ वर पालिकेच्या पी/उत्तर विभागाच्या वतीने ACPN/74../SR/AEM दिनांक ०६/०२/२४ रोजी ५० वर्षा पूर्वी पासून मढ कोळीवड्यातील २६ रहात्या घरांना हाॅस्पिटल बनविण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या २६ घरात किमान १०४ कुटूंब राहत आहेत.
या बाबत मच्छिमार सहकारी संस्था, मढ ग्रामस्थांची श्री हरबादेवी मंदीर ट्रस्ट यांनी हरबा देवी मंदिरात सभा आयोजित केली होती. त्या अनुषंगाने काल खासदार गोपाळ शेट्टी यांची मढ ग्रामस्थांची भेट घेतली.
डीसीपीआर 2034 अंतर्गत पालिकेचे मढ येथे पाच मजली हाॅस्पिटल बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्याच बरोबर रहात्या वस्तीत पार्किंग, निवासी व्यवस्था इत्यादी भर मढ कोळीवाड्यात आरक्षणे टाकून कोळीवाडा गिंळकृत करण्याचा पालिकेचा डाव आहे. आम्ही प्राथमिक उपचार व लहानसे प्रस्तूती गृह ऐवढी आपेक्षा केली होती. गावकरी उद्धवस्त करण्याची मागणी नव्हती. त्यामुळे गावात हाॅस्पिटल नको ही मढ ग्रामस्थांची ठाम भूमिका असंल्याचे आम्ही खासदार शेट्टी यांना दिल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली.
सिटीएस. क्र. १९७ ऐवजी मौजे एरंगळ सर्वे क्र. १४५, १४४ अथवा मौजे धारवली सर्वे क्र. १५७, २६३, ४० या सरकारी भूखंडावर गावाच्या बाहेर हाॅस्पिटल बनवावे. तसेच सिटीएस. क्र. १९७ गार्डन आरक्षण कायम ठेऊन त्या ठिकाणी ओपन जिम, वाकींग पार्क बनवावे. अशी ग्रामस्थांनी मांगणी केली. त्यावर खासदार गोपाळ शेट्टी यांनी संबंधित पालिका अधिकारी मंदार चौधरी यांना फोन वरुन माहिती घेतली. हॉस्पिटल करिता दुसरा सरकारी भूखंड ग्रामस्थांच्या सुचनेनुसार पाहून प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली. वरिष्ठ अधिका-यांशी बोलून जागा बदलून घ्यावी. मी देखील आयुक्तांशी बोलतो असे त्यांनी सांगितले. तर आपण उपस्थित शेकडो महिला व पदाधिकारी व मढ ग्रामस्थांसोबत आहे अशी हमी खासदार शेट्टी यांनी दिली. नंतर स्थानिक आमदार असलम शेख यांची देखिल ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांनी देखील मी ग्रामस्थांन सोबत आहे. परंतु एकदा सभा घेऊन याचा फेरविचार करावा असे सांगितले.
दरम्यान, सदर शिष्टमंडळात मच्छिमार नेते किरण कोळी, हरबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील, संतोष कोळी, जयवंती कोळी, अक्षय कोळी, ग्रेगरी एरंगले, उपेश कोळी, संगीता कोळी, अनिता नगी, अंकूश कोळी इत्यादी शेकडो महिला सह उपस्थित होते.