Join us

माधव भंडारी यांचे ‘पुनर्वसन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:23 AM

मंत्रिपदाचा दर्जा : पुनर्वसन प्राधिकरणावर नियुक्ती

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांची महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा असेल. मध्यंतरी भंडारी यांना विधान परिषदेवर पाठविले जाणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना तशी संधी मिळू शकली नाही. भाजपाच्या स्थापनेपासूनचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. भाजपाचे अ.भा. सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांचे ते निकटचे नातेवाईक आहेत. या नियुक्तींच्या निमित्ताने भंडारी यांच्यासारख्या जुन्या निष्ठावंतास उशिरा का होईना, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली आहे.राज्य पुनर्वसन प्राधिकरणाची शासनाने आज पुनर्रचनादेखील केली. मदत व पुनर्वसन मंत्री हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष तर भंडारी हे उपाध्यक्ष असतील. महसूल, वित्त, जलसंपदा, उद्योग, ऊर्जा व वनमंत्री हे या समितीचे सदस्य असतील.राज्य शासनाच्या कोणत्याही प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची कामे या प्राधिकरणामार्फत करण्यात येतील. पुनर्वसनासंबंधी नियम करणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे काम हे प्राधिकरण करेल. पुनर्वसनासंदर्भात आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेणे, त्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश देणे व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम प्राधिकरण करेल.

टॅग्स :भाजपा