ठाणे भारत बँकेच्या अध्यक्षपदी माधव गोखले, उपाध्यक्षपदी जोशी
By admin | Published: May 25, 2015 10:50 PM2015-05-25T22:50:21+5:302015-05-25T22:50:21+5:30
वार्षिक १७०० कोटींची उलाढाल असलेल्या ठाणे भारत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माधव गोखले तर उपाध्यक्षपदी उत्तम जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ठाणे : वार्षिक १७०० कोटींची उलाढाल असलेल्या ठाणे भारत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माधव गोखले तर उपाध्यक्षपदी उत्तम जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणूकीत बँकेचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे.
बँकेचे संस्थापक संचालक असलेल्या गोखलेंनी गेली दहा वर्ष अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून सलग तिसऱ्यांदा ते अध्यक्षपदी निवडून आले आहेत. कॅटरिंगचा व्यवसाय करणारे जोशी हे देखिल गेली २५ वर्ष बँकेवर संचालक आहेत. ११ मे रोजी बँकेच्या २०१५ ते २०२० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यामध्ये गोखले आणि जोशी यांच्यासह मनिषा नातू, डॉ. ललिता देवधर, डॉ. रविंद्र रणदिवे, चंद्रशेखर परांजपे, संजय पाटील, हेमंत महाजन, सीताराम गोसावी, डॉ. राजेश्वर मोघेकर, मिलिंद गोखले आणि किरण वैद्य हे १२ संचालक बिनविरोध निवडून आले. बॅकेत १३ संचालकांच्या जागा असतांना एससीएसटीच्या एका जागेसाठी एकही अर्ज न आल्याने १२ संचालकांची निवड जाहीर करण्यात आली. त्यातही सर्वसामान्य आठ, इतर मागासवर्गीय आणि एनटीची प्रत्येकी एक तर महिलांच्या दोन या प्रत्येक विभागातून प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सर्व १२ संचालकांची बिनविरोध निवड झाली. योगायोग म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत सर्व संचालकांमधून गोखले यांचा अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी जोशींचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही २१ मे रोजी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माणिक इंगळे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
४बँकेचा एकूण व्यवसाय १७०० कोटी असून तो चार हजार कोटींपर्यन्त नेण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच गंगाजळी आणि भागभांडवल ६० ते ६५ वरुन १०० कोटींपर्यन्त नेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष माधव गोखले यांनी सांगितले.