अवैध मासेमारीने घेतला मढच्या विधवा कोळी महिलेचा बळी
By मनोहर कुंभेजकर | Published: July 11, 2024 04:54 PM2024-07-11T16:54:14+5:302024-07-11T16:54:27+5:30
अवैध मासेमारी करणारे बोट मालक मासळी खेरेदी करण्यासाठी येणा-या कोळी महिलांना गोपनीय ठिकाणी लपण्यास सांगतात.
मुंबई- रायगडच्या उरण तालुक्यात करंजा, मोरा, रेवस, दिघोडा, केळवणे, जिता इत्यादी कोळीवाड्यात अवैध मासेमारी विरोधात कारवाई करण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदेश देऊन देखील अवैध मासेमारी सुरुच आहे. मत्स्यव्यवसाय आयुक्त, कोस्ट गार्ड, कोस्टल पोलिस, पोलिस खाती करतात काय?असा सवाल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी केला आहे.
अवैध मासेमारी करणारे बोट मालक मासळी खेरेदी करण्यासाठी येणा-या कोळी महिलांना गोपनीय ठिकाणी लपण्यास सांगतात. सदर महिला तिवरांच्या झाडा खाली अंधारात नौका मालकांच्या सांगण्यावरुन तासंनतास लपून बसतात. त्या ठिकाणी मोठेमोठे विषारी डांस चावतात. मढ कोळीवाड्यातील विधवा महिला कोळी महिला मदल्यानं झुजा मकूचा हिला आठवड्यापूर्वी विषारी डांस चावल्यामुळे पूर्ण शरीरावर सूज येऊन रक्तदाब कमी झाला. नातेवाईकांनी प्रथम कांदिवली पश्चिम येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालय व नंतर तीला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तीचे गेल्या मंगळवारी निधन झाले अशी माहिती किरण कोळी यांनी दिली.
मदल्यानं झुजा मकूचा हिच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून दहा लाखाची अर्थिक मदत करावी अशी मागणी किरण कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका पत्राद्वारे केली आहे.
सरकारने मनात आणले तर एका दिवसात मासेमारी बंद होऊ शकते. शिवशाही सरकारने १९९५ मध्ये नारायण राणे मत्स्यव्यवसाय मंत्री असताना एका आदेशात पावसाळी मासेमारी बंदी केली होती. तेव्हा पासून काटेकोरपणे बंदी होत होती. परंतू जून २०२३ पासून पून्हा पावसाळी अवैध मासेमारी सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष व खात्याचे मंत्री यांचे आदेश धाब्यावर बसून अर्थिक भ्रष्ट्राचारामुळे अवैध मासेमारी सुरु आहे. अवैध मासेमारेची तक्रार केली की, मत्स्यव्यवसाय आयुक्त नेमके सुट्टीवर का जातात? अवैध मासेमारीमुळे मढच्या एका विधवा कोळी महिलेचा बळी गेला. त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला.