आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनाला समजले नाही, मधुकर भावेंनी व्यक्त केली खंत
By स्नेहा मोरे | Published: October 29, 2023 12:47 AM2023-10-29T00:47:11+5:302023-10-29T00:47:35+5:30
Mumbai: आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनासह अवघ्या महाराष्ट्राला समजले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली.
मुंबई - आचार्य अत्रे यांनी आपल्या साहित्यात पुढील शंभर वर्षांचे लिखाण केले आहे, त्यामुळे त्यांच्यासारखा साहित्यिक पुन्हा होणे नाही. आज राज्यातील राजकीय तमाशा पाहताना आचार्य अत्रे यांची गरज अधिक भासते, आज अत्रे असायला हवे होते. आचार्य अत्रेंचे मूल्य राज्य शासनासह अवघ्या महाराष्ट्राला समजले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे अशी खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली.
मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राची संक्षिप्त आवृत्ती ' कऱ्हेचे पाणी ' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी भावे म्हणाले, आजची पिढी ही वाचन आणि साहित्यापासून दुरावली आहे, अशा काळात या संक्षिप्त आवृत्तीच्या माध्यमातून वाचनाशी नाळ जोडण्यास मदत होईल. आचार्य अत्रे यांनी एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली आहे, त्यामुळे त्यांना अनुभव नाही असे कुठलेही क्षेत्र नाही. येत्या काळात अत्रे यांचे स्मरण करत त्यांचा लढा पुढे घेऊन जाण्याचे काम प्रत्येकाचे आहे.
या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ विधीज्ञ अॅड राजेंद्र पै यांनी सांगितले, आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने प्रकाशित झालेले हे पहिले पुस्तक आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे एखादा चित्रपट प्रकाशित होण्यापूर्वी त्याचा ट्रेलर येतो, त्याच्या अगदी उलट पाच हजार पृष्ठांचे आत्मचरित्र प्रकाशित झाल्यानंतर त्यांची संक्षिप्त आवृत्ती २०० पानांमध्ये वाचकांच्या भेटीला आली हा वेगळा विक्रम आहे. त्यामुळे ही अत्रेंची इच्छा असावी असेही त्यांनी अधोरेखित केले. याखेरीज, या आत्मचरित्राचा दुसरा भागही संक्षिप्त स्वरुपात यावा अशी विनंती विश्वकर्मा प्रकाशनाकडे केली. भविष्यातही आचार्य अत्रे यांचे साहित्य नव्या स्वरुपात आणावे असा मानसही व्यक्त केला.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आचार्य अत्रे यांचे नातू हर्षवर्धन देशपांडे, आचार्य अत्रे स्मृतीमंडळाचे अध्यक्ष अॅड बाबुराव कानडे, विश्वकर्मा प्रकाशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड राजेंद्र पै आणि वरिष्ठ संपादक पराग करंदीकर उपस्थित होते.