माधुरी दीक्षित भाजपातर्फे निवडणूक रिंगणात?; नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 07:18 AM2023-11-16T07:18:42+5:302023-11-16T07:19:00+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवादरम्यान २३ सप्टेंबरला मुंबईत आले होते.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : धकधक गर्ल, लाखो दिलांची धडकन, लेडी अमिताभ... अशी असंख्य विशेषणे जिच्या नावाच्या अलीकडे लावली जातात ती सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने आता लवकरच निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपतर्फे माधुरीला तिकीट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, नेमक्या कोणत्या मतदारसंघातून हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवादरम्यान २३ सप्टेंबरला मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे समजते. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित-नेने भाजपच्या तिकिटावर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळातही यासंदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे समजते.
मतदारसंघ कोणता?
भाजपच्या ताब्यात मुंबईतील तीन मतदारसंघ आहेत. त्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे. माधुरीला येथून तिकीट देण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे. तर सध्या खासदार गजानन कीर्तिकर आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात वाद आहे. त्यावर पडदा टाकण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आले असले तरी उद्धव ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात ही जागा भाजपला मिळाल्यास तेथून माधुरीला तिकीट मिळण्याची शक्यता आहे.