मुंबई : व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने रेल्वे सुरक्षा बलाच्या मुंबई सेंट्रल स्थानकातील निरीक्षक सत्यजीत पवार यांनी उच्चशिक्षित कुटुंबातील अल्पवयीन मुलीची मुंबईत सेटल होण्याचे आमिष दाखविणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या तावडीतून सोमवारी सुटका केली. दोघेही मध्य प्रदेशमधील असून, मुलगी घरातून २ लाख रुपये घेऊन मुंबईला पळून आल्याचे चौकशीत समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील सुखवस्तू कुटुंबात १७ वर्षीय शिवानी (नावात बदल) राहत होती. याच परिसरात ओमकार (नावात बदल) हा १७ वर्षीय युवकही राहत होता. गेल्या वर्षभरापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आपण लग्न करून मुंबईत सेटल होऊ, असे आमिष ओमकारने शिवानीला दाखवत घरातून २ लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले.
८ आॅक्टोबरला ओमकार शिवानीला घेऊन मध्य प्रदेश येथून पळाला. शिवानीच्या घरच्यांनी स्थानिक पोलीस स्थानकात अपहरणाची तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांनी संबंधित तरुणाचे फोटो आणि माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविली, तर अमृतसर एक्स्प्रेसने रविवार-सोमवारच्या मध्यरात्री दोघे मुंबईला येणार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी आरपीएफला दिली.
मुंबई सेंट्रल स्थानकातील पवार यांनी सूरत, बोरीवली आणि मुंबई सेंट्रल येथील आरपीएफच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर संबंधितांची माहिती व फोटो पाठविले. त्यामुळे तपासास दिशा मिळाली. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मुंबई विभागातील सर्व रेल्वे स्थानकांना अॅलर्ट दिला.
याचदरम्यान सीसीटीव्हीत जॅकेट घातलेला मुलगा आणि घाबरलेल्या अवस्थेत मुलगी मुंबई सेंट्रल स्थानकात दिसली. आरपीएफ निरीक्षक पवार आणि टीमने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती मध्य प्रदेश येथून पळून आल्याची कबुली त्यांनी दिली. मुलीकडून रोख एक लाख ५५ हजार रुपयेही जप्त केल्याची माहिती मुंबई सेंट्रल येथील आरपीएफचे निरीक्षक सत्यजीत पवार यांनी दिली.