Join us

उत्तर मुंबईत भूषण पाटील यांच्या मतांची टक्केवारी वाढवण्यात मागाठाणे, मालाडचा हातभार

By रेश्मा शिवडेकर | Published: June 09, 2024 4:31 PM

नुकतीच झालेली निवडणुक लोकसभेची असली तरी विद्यमान आमदार भविष्यातील आपली तिकीट पेरणीच या निमित्ताने करत होते. खासकरून महायुतीत तिकीटवाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता प्रकाश सुर्वे यांनी मागाठाण्यात आपली ताकद मतांच्या गणितावरून दिसून येईल या करिता चांगला जोर लावला होता. मात्र...

मुंबई - उत्तर मुंबईतकाँग्रेसचे भूषण पाटील यांची मतांची टक्केवारी वाढविण्यात मागाठाणे या मराठीबहुल आणि मालाड या मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघाचा हातभार लागल्याचे दिसून येत आहे. हे मतदारसंघ अनुक्रमे शिदेंसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्याकडे आहेत.

नुकतीच झालेली निवडणुक लोकसभेची असली तरी विद्यमान आमदार भविष्यातील आपली तिकीट पेरणीच या निमित्ताने करत होते. खासकरून महायुतीत तिकीटवाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच पाहता प्रकाश सुर्वे यांनी मागाठाण्यात आपली ताकद मतांच्या गणितावरून दिसून येईल या करिता चांगला जोर लावला होता. मात्र गेल्या लोकसभेच्या तुलनेत याच मतदारसंघातून गोयल यांची मते कमी (६,९६५) झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला या ठिकाणी सुमारे १९ हजार मते जादा मिळाली आहेत.

मागाठाण्यापाठोपाठ दहिसरमधून भाजपची ६,८०४ मते कमी झाली आहेत. मात्र काँग्रेसच्या मतांची वाढ १०,३६८ आहे. तुलनेत कांदिवली पूर्व आणि चारकोपमधून भाजपला तितकासा धक्का बसलेला नाही. मात्र चारकोपमधून काँग्रेसला ११,१४८ मते अधिकची मिळाली आहेत. बोरीवली या सुनील राणे यांच्या मतदारसंघातून भाजपची साडेपाच हजाराच्या आसपास मते कमी झाली असली तरी काँगेसच्या मतांमधील वाढ १२,२८१ आहे. भाजप-शिंदेसेना आमदारांची कमी झालेली मते शिवसेनेची असल्याचे गृहीत धरले तरी त्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. 

…तर गोयल यांना झुंजवले असते -उत्तर मुंबई भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. मात्र तरिही या मतदारसंघाच्या बाबतीत महाआघाडीची गणिते चुकल्याची चर्चा आहे. हा मतदारसंघ आघाडीपैकी कुणालाच नको होता. मात्र उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर या ठिकाणी निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यांनी दहिसर पाठोपाठ मराठीबहुल भागात बैठका, भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली होती. आयत्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला. या ठिकाणी सेनेने घोसाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले गेले असते तर त्यांनी गोयल यांना निश्चितपणे झुंजवले असते.

मनसेची मते गेली कुठे? -२०१९च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतील सहा विधानसभांपैकी मनसेने दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व या अवघ्या तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मागाठाण्यात मनसेचे नयन कदम दुसऱया क्रमांकावर होते.अवघ्या तीन मतदारसंघात मिळून मनसेला ६८,२४४ मते मिळाली होती. परंतु, प्रत्येक विधानसभेत घटलेली मते पाहता महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱया मनसेच्या या मतांचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येत नाही.

भाजपची मतांची टक्केवारी घटली -पियुष गोयल याना ६.८० लाखांच्या आसपास मते मिळाली आहेत. हे प्रमाण एकूण मतांच्या ६५. ६८ % आहे. तर शेट्टी गेल्या निवडणुकित ७१.४० % मते घेऊन निवडून आले होते. २०१४ मध्ये ते ७०% होते.भाजपची कमी झालेली मते, काँग्रेसची वाढलेली मतेविधानसभा…विद्यमान आमदार……पियूष गोयल….भूषण पाटील

बोरीवली…….सुनील राणे(भाजप)…-५,५११………..१२,२८१

दहिसर………मनिषा चौधरी(भाजप)…-६,८०४…….१०,३६८

मागाठाणे…..प्रकाश सुर्वे(शिंदेसेना)….-६,९६५……१८,९९६

कांदिवली(पू)..अतुल भातखळकर(भाजप).. -१८८३….८,१६९

चारकोप……..योगेश सागर(भाजप)…-४,५१६….११,१४८

मालाड (प)…..अस्लम शेख(काँग्रेस)…-१,४२५…..१९,५३७

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४काँग्रेस