मागाठाणे मेट्रो स्टेशनवरील शिडी पळवणाऱ्याला अटक; कस्तुरबा पोलिसांची कारवाई
By गौरी टेंबकर | Published: November 1, 2023 02:40 PM2023-11-01T14:40:11+5:302023-11-01T14:40:34+5:30
बोरिवली पूर्व स्टेशनवर मागाठाणे मेट्रो स्टेशनवर असलेली ॲल्युमिनियमची शिडी पळवण्याचा प्रयत्न सोमवारी सकाळी करण्यात आला.
मुंबई: बोरिवली पूर्व स्टेशनवर मागाठाणे मेट्रो स्टेशनवर असलेली ॲल्युमिनियमची शिडी पळवण्याचा प्रयत्न सोमवारी सकाळी करण्यात आला. मात्र सतर्क कर्मचाऱ्याच्या मदतीने त्या चोराला पकडण्यात कस्तुरबा पोलिसांना यश मिळाले. अटक आरोपीचे नाव फिलिप गायकवाड (२४) असे असून त्यांनी यापूर्वी देखील या स्टेशनवरून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तक्रारदार दिनेश देवासी (२५) हे सदर ठिकाणी हाउसकीपिंग सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांना ३० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मागाठाणे मेट्रो स्टेशनचे कंट्रोलर सुभाष जैन यांनी फोन करून कळवले की एका इसमाला ॲल्युमिनियमची शिडी चोरी करण्याचा प्रयत्न करताना सुरक्षारक्षक सुरेश कानडे आणि पर्यवेक्षक वैभव आंब्रे यांनी पकडले आहे.
देवासी हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी सदर व्यक्तीला त्याचे नाव विचारले. तेव्हा त्याचे नाव फिलिप गायकवाड असे असून तो विरारचा राहणार असल्याचे समजले. त्यानुसार त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. देवासी यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरातून ४३ स्क्वेअर मीटरचे ॲल्युमिनियम बॉक्स पाईप चोरीला गेले आहेत. ज्याची किंमत २ लाख ९८ हजार ५५७ असून गायकवाड यानेच ती चोरी केल्याचा त्यांचा संशय आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३७९, ५११ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे.