Join us

मॅगीवर चर्चा सुरू

By admin | Published: May 21, 2015 1:19 AM

उत्तर प्रदेशात घेतलेल्या मॅगीच्या काही नमुन्यात आरोग्यास हानिकारक असणारे पदार्थ आढळल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : मॅगी हा मुलांना पसंतीस पडणारा खाद्यपदार्थ एफडीएच्या कचाट्यात सापडला आहे. उत्तर प्रदेशात घेतलेल्या मॅगीच्या काही नमुन्यात आरोग्यास हानिकारक असणारे पदार्थ आढळल्याने विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील मॅगीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) हे पॅकबंद आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये काही प्रमाणात वापरले जाते. पण त्याचे प्रमाण ठरलेले आहे. उत्तर प्रदेशात मॅगीचे काही नमुने तपासले असता एमएसजी आणि शिशाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले. हे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. हे पाहता लखनौ एफडीएने ही माहिती केंद्रीय अन्न आणि औषध विभागालाही कळवली आहे. उत्तर प्रदेशातील घटनेनंतर राज्यातही मॅगीचे १० नमुने घेण्यात आले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. दोन ते तीन दिवसांत हा अहवाल येणार आहे. त्यानंतर मॅगी आरोग्यास हानिकारक आहे की नाही, याचा खुलासा होईल. हा तपास सुरू असल्याचे एफडीएचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)