मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हनुमान चालीसा म्हणण्याचा केलेला निर्धार आणि त्यानंतर राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्यावर भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे (Sedition) अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले आहे. राणा दाम्पत्य सध्या कोठडीत आहेत. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात असणार आहेत. कारागृहात घरचे जेवण मिळण्यासाठी राणा दाम्पत्याने अर्ज केला होता. मात्र, कोर्टाने राणा दाम्पत्याची याचिका फेटाळली आहे.
मुंबईतील न्यायदंडाधिकारी कोर्टाने अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगात घरच्या जेवणासाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला कोठडीत सर्वांना मिळणारे अन्नच ग्रहण करावे लागणार आहे. दुसरीकडे, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता या प्रकरणी शनिवारी निर्णय घेण्यात येणार आहे.
व्यस्त कामकाजामुळे सुनावणी पुढे ढकलली
मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी टाळण्यामागचे कारणही दिले आहे. व्यस्त कामकाजामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे. याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली होती की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सुनावणी घेण्यात यावी. पण, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर अनेक महत्त्वाची प्रकरणे असल्यामुळे राणा दाम्पत्यांची सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला. राणा दाम्पत्याला वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणायचा पवित्रा मागे घेतल्यानंतर लगेचच नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यांनंतर राणा दाम्पत्याला रविवारी वांद्रे कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेला राजद्रोहाचा एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. राणा दाम्पत्याने यानंतर मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर मुंबई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे, प्रक्षोभक वक्तव्य यासंदर्भात गुन्हे दाखल केले आहेत.