मुंबई - वांद्रयात बँडस्टँड येथील प्रसिद्ध सी रॉक हॉटेलच्या जागेवर लवकरच भव्य हॉटेल उभे राहणार आहे. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत सी रॉक हॉटेल उद्धवस्त झाले होते. 2009 साली ताज ग्रुपने सी रॉक हॉटेल विकत घेतले. सी रॉक हॉटेलच्या पुनर्बांधणीसाठी ताज ग्रुपला सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. 2010 साली हे हॉटेल पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. नव्या हॉटेलमध्ये 31 व्या मजल्यावर स्वीमिंग पूल असेल.
इंडियन हॉटेल्स कंपनीकडून ताज हॉटेल्स संचलन केले जाते. या कंपनीला हॉटेलच्या 30 मजली बांधकामासाठी परवानगी मिळाली आहे. तीस पैकी पहिले तीन मजले बेसमेंटचे असतील. सहा मजल्यावर वेगवेगळया सुखसुविधा असतील. 7 ते 29 मजले गेस्ट रुम्सचे असतील आणि 31 व्या मजल्यावर स्वीमिंग पूल असेल. नव्या हॉटेलच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी 30 ऑक्टोंबरला महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली होती.
ताज ग्रुपने क्लॅरीड्ज हॉटेल्सचे सुरेश आणि संजीव नंदा यांच्याकडून 2009 साली 680 कोटी रुपयांना हे हॉटेल विकत घेतले होते. 1970 साली यू.बी. लुथरीया यांनी सी रॉक हॉटेल बांधले. 80-90च्या दशकात सी रॉक सेलिब्रिटींचे आवडीचे ठिकाण होते. 1993 साली बॉम्बस्फोट होण्याआधी या हॉटेलमध्ये बॉलिवूडच्या अनेक ग्लॅमरस पाटर्या रंगल्या. काही वर्षांपूर्वी सी रॉक हॉटेलचा काही भाग पुन्हा सुरु करण्यात आला. पण या हॉटेलला पूर्वीचा लौकीक लाभला नाही.
समुद्राजवळ मोक्याच्या ठिकाणी या हॉटेलचा भूखंड सहा एकरमध्ये पसरला आहे. 2005 साली क्लॅरीड्ज ग्रुपने लुथरीया यांच्याकडून 330 कोटींना हे हॉटेल विकत घेतले होते. याच बँडस्टँडमध्ये ताज ग्रुपसचे ताज लँडस एन्ड हे सुद्धा हॉटेल आहे.