Join us

आषाढी वारीसाठी महाआरोग्य शिबीर, आरोग्य विभाग १० कोटी खर्च करणार

By संतोष आंधळे | Updated: June 14, 2024 20:31 IST

पंढरपूर येथे वर्षातून चार एकादशीनिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविकांना तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई : आषाढी वारीनिमित्त दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक ठिकाणच्या पालख्या या दिवशी पंढरपुरात दाखल होत असतात. यावेळी आलेल्या भाविकांना आरोग्याच्या सुविधा कमी पडू नये यासासाठी पंढरपुरात महा आरोग्यशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विशेष बाब म्हणून ९ कोटी ४४ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

पंढरपूर येथे वर्षातून चार एकादशीनिमित्त राज्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्या भाविकांना तातडीच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. जे २४ तास भाविकांसाठी खुले असणार आहे. त्यानुसार पंढपूर येथे आषाढी वारीकरिता या शहरातील वारीची ठिकाणे व मार्गावर १५ ठिकाणी तात्पुरते दवाखाने, १७ ठिकणी उपचार केंद्रे व ३ ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली जागा, भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणारे मनुष्यबळ ( डॉक्टर, विशेषज्ञ, निमवैद्यकीय अधिकारी / कर्मचारी ), रुग्णवाहिका,औषध व साहित्य सामुग्रीच्या दृष्टीने होणाऱ्या खर्चास ' खास बाब ' म्हणून खर्चास मंजुरी दिली आहे.

अनेक भाविक या आषाढी वारीकरिता  पायी चालत येत असतात. त्यामुळे काही भाविकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध नागरिक या ठिकणी दर्शनासाठी येत असतात. त्यांना आरोग्याच्या सेवा अशा काळात मिळणे गरजेचे असते.

३ कोटी खर्च आरोग्य डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर

प्रास्तवित मंजूर खर्चापैकी ३ कोटी खर्च डॉक्टर, नर्सेस व इतर कर्माच्याकरिता अल्पोहार आणि भोजनव्यवस्थेवर करण्यात येणार आहे. तर औषध सामुग्रीसाठी २ कोटी ४० लाख खर्च करण्यात येणार आहे. मंडप आणि त्याकरिता आवश्यक बाबींवर ९० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.