Rajesh Tope: राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठीही सज्ज, केंद्रानं ऑक्सिजनची गरज भागवावी; राजेश टोपेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:52 PM2021-05-07T13:52:14+5:302021-05-07T13:52:48+5:30
Rajesh Tope: राज्य सरकार कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून ऑक्सिजन निर्मितीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Rajesh Tope: राज्य सरकार कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून ऑक्सिजन निर्मितीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या ३८ ऑक्सिजन प्लांटमधून ५३ मेट्रीक टन ऑक्सिनजची निर्मिती होत आहे. पण सध्या इतका ऑक्सिजन राज्याला पुरत नाहीय. राज्याची १७०० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज केंद्र सरकारनं भागवली पाहिजे, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजेश टोपे यांनी यावेळी कोरोना विरुद्धच्या उपाययोजना आणि राज्य सरकार करत असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. राज्यात आतापर्यंत २८ लाख लोकांना कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत आणि येत्या काळात जास्तीत जास्त वेगानं लीसकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सरकार संपूर्णपणे प्रयत्न करत आहे, अशी माहिती टोपे यांनी यावेळी दिली.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोनच लसी सध्या नागरिकांना उपलब्ध होत असल्या तरी यात कोव्हॅक्सीनचा राज्यात तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे कोव्हॅक्सीनच्या पुरवठ्याबाबतही केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्रानं याची लवकरात लवकर दखल घ्यावी, असंही टोपे म्हणाले. रशियावरुन आलेल्या स्पुटनिक-व्ही लसीच्या दराबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली आहे. लवकरच स्पुटनिक-व्ही लसीची किंमत निश्चित करण्यात येणार आहे.
राज्य सरकार तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
ऑगस्ट महिन्यानंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचाही राज्य सरकार विचार करुन तयारीला लागलं असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका होऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. १८ वयोगटाखालील मुलांचं लसीकरण देखील आपल्याला करता येत नाहीय. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लहान मुलांसाठी लागणाऱ्या तत्सम आरोग्य सुविधा, व्हेंटिलेटर्स, बेड्स यांची व्यवस्था करण्याचं काम राज्य सरकारनं सुरू केलं असल्याचं टोपे यांनी सांगितलं.