पोलिसांच्या संघटनेसाठी महामोर्चा
By admin | Published: March 29, 2016 02:18 AM2016-03-29T02:18:45+5:302016-03-29T02:18:45+5:30
राज्यात पोलिसांच्या विविध समस्या सरकार दरबारी लावून धरण्यासाठी पोलिसांना संघटना करून द्यावी, म्हणून वाहतूक विभागातील एका पोलीस शिपायाची पत्नी आझाद मैदानात उपोषणास
मुंबई : राज्यात पोलिसांच्या विविध समस्या सरकार दरबारी लावून धरण्यासाठी पोलिसांना संघटना करून द्यावी, म्हणून वाहतूक विभागातील एका पोलीस शिपायाची पत्नी आझाद मैदानात उपोषणास बसली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी शेकडो पोलीस पत्नींनी मैदानात महामोर्चा काढला.
यशश्री प्रमोद पाटील असे उपोषण करणाऱ्या पोलीस पत्नीचे नाव आहे. पोलीस बॉईज संघटनेसह राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पोलीस राज्य शासकीय कर्मचारी असल्याने विविध विभागांतील आणि खात्यातील शासकीय कर्मचारी वेळ पडल्यास संपूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात उतरतील, असा इशारा शासकीय कर्मचारी संघटनेचे प्रभाकर देसाई यांनी दिला आहे.
पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुधाले म्हणाले की, पोलिसांवर होणाऱ्या अन्यायांविरोधात त्यांची संघटना व्हावी म्हणून पोलिसांच्या पाल्यांची पोलीस बॉईज संघटना निर्माण केली आहे. तत्काळ पोलिसांच्या प्रलंबित मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पोलिसांच्या कुुटुंबीयांना आणि अन्याय झालेल्या पोलिसांनाही मैदानात उतरवण्याची तयारी केली जाईल. (प्रतिनिधी)