मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत पालिकेच्या विविध वॉर्डात १ डिसेंबर ते ३० डिसेंबर या काळात स्वच्छता अभियानातून मिळून १३०० दशलक्ष टन राडारोडा (डेब्रीज) आणि १८३ दशलक्ष टन कचरा गोळा करण्यात आला आहे. याच प्रकारे २२ हजार २७७ किलोमीटर इतक्या अंतराचे रस्ते धुऊन काढण्यात आले आहेत. संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मुंबईत कानाकोपऱ्यातील, लहानसहान गल्लीबोळातील राडारोडा, कचरा उचलण्यासह स्वच्छतेची कार्यवाही होत असल्याने मुंबईकर नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.पालिकेकडून या स्वच्छता मोहिमेसाठी ५ हजार २४५ इतके मनुष्यबळ एकाचवेळी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. या शिवाय जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा गोळा करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी तब्बल ५०८ वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही मदतीला आहेत. ही स्वच्छता मोहीम जानेवारी अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे शनिवारी ,रविवारी होणाऱ्या या मोहिमेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन सर्व ठिकाणांची पाहणी करत आहेत.रविवारी महास्वच्छता अभियानरविवारी मुंबईत दहा ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’ उपक्रम राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता या महा स्वच्छता अभियानाला भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथून सुरुवात होणार आहे. आज होणाऱ्या महा स्वच्छता मोहीमेत सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.इथे होणार स्वच्छता-गेट वे ऑफ इंडिया, चर्चगेट (ए विभाग)-वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा (ई विभाग)-सदाकांत ढवण मैदान, परेल (एफ दक्षिण)-वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम (एच पश्चिम विभाग)-वेसावे (वर्सोवा) चौपाटी, अंधेरी (के पश्चिम विभाग)
-बांगूर नगर, गोरेगाव (पी दक्षिण विभाग)-सावरकर मैदान, कुर्ला पूर्व (एल विभाग)-अमरनाथ उद्यान, देवनार (एम पूर्व विभाग)-डी मार्ट जंक्शन, हिरानंदानी संकूल, भांडूप (एस विभाग)-ठाकूर गाव , कांदिवली (आर दक्षिण विभाग)