मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 06:33 AM2024-10-10T06:33:52+5:302024-10-10T06:34:40+5:30
राज्य सरकारचा भ्रष्टाचारी, महाराष्ट्र विरोधी, शिवद्रोही, शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी मविआची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत राज्यातील विधानसभेच्या २८८ पैकी २१८ जागांवर आतापर्यंत एकमत झाले असून, ७० जागांच्या वाटपावर अजून तोडगा निघायचा आहे. येत्या चार-पाच दिवसांत या जागांवर तोडगा काढून जागा वाटप पूर्ण केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बुधवारी मविआच्या नेत्यांची जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचेही पडसाद उमटले. हरयाणा निकालावरून काँग्रेसवर टीका करणारा अग्रलेख बुधवारच्या सामना वृत्तपत्रात लिहण्यात आला आहे. त्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
दुसरीकडे हरयाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत व्हायला नको, यासाठी चुकीचे जागा वाटप टाळण्याबाबत गंभीरपणे चर्चा झाली. हरयाणात बंडखोरांचा काँग्रेसला मोठा फटका बसला, त्यामुळे राज्यात बंडखोरी टाळण्यावर तीनही पक्षांनी भर द्यावा, अशीही चर्चा झाल्याचे समजते.
या बैठकीला काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, शरद पवार गटातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, तर उद्धव सेनेतर्फे संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. माविआचे जागावाटप रखडली तर दुसरीकडे महायुतीत सर्व आलबेल असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मविआच्या उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्या संयुक्त पत्रकार परिषद
येत्या ११ तारखेला आम्ही एकत्र येत आहोत. राज्य सरकारचा भ्रष्टाचारी, महाराष्ट्र विरोधी, शिवद्रोही, शेतकरी विरोधी चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी मविआची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.