मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी नव्या शिंदे-भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून, दुसऱ्या दिवशीही सरकारवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन केलेल्या बंडाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात पडताना दिसत आहेत. पहिल्या दिवशी खोके आणि ओकेवरून टोलेबाजी केल्यानंतर आता, गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी, अशा घोषणांनी विधिमंडळ परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले.
शिंदे गटाच्या बंडाचे केंद्र असलेल्या गुवाहाटीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घोषणा दिल्या. गद्दारांना भाजपची ताट-वाटी, चलो गुवाहाटी,चलो गुवाहाटी!, या घोषणेने सर्वाचे लक्ष वेधले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. आधी सूरत मग गुवाहाटी त्यानंतर गोवा अन् मग ते महाराष्ट्रात आले. त्यांच्या बंडाचे केंद्र गुवाहाटी होते. गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेची गणिते आखली गेली. त्याचाच धागा पकडत विरोधकांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल
आताच्या घडीला अनेकविध प्रकरणांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीसह केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पाहायला मिळाले. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला प्रश्न विचारत आहेत. अधिवेशन सुरु होण्याआधी महाविकास आघाडीचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केलेल्या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन निघाला. ५० खोके एकदम ओके!, रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!, सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. आले रे आले गद्दार आले, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.