Join us  

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर, राज्यपालांची भेट घेतली; नेमके कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 5:09 PM

Maha Vikas Aghadi News: महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भूमिकेला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे.

Maha Vikas Aghadi News: एकीकडे राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. तसेच दुसरीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. आगामी काही दिवसांत विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. 

महाराष्ट्र विधानपरिषद हे विधानमंडळातील सर्वोच्चपद गेले २ वर्षे ६ महिन्यांपासून रिक्त आहे. लोकशाही तत्त्व जपणारे वरीष्ठ सभागृह हे विनाकॅप्टन चालू असल्याची भावना महाविकास आघाडीच्या आमदारांची झालेली आहे. सद्यस्थितीत १४ व्या महाराष्ट्र  विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. पर्यायाने विधान परिषदेचे या शासन कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असेल. त्यामुळे सभापती या संविधानिक पदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशा मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांना दिले, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत राज्यपाल सकारात्मक

सभापतीपदाची  निवडणूक व्हावी, अशी भूमिका वारंवार महाविकास आघाडीने मांडली आहे. हे पद रिक्त राहणे हे घटनेच्या विरोधात आहे. सभापती पदासाठी निवडणूक लावणे हा राज्यपाल यांचा अधिकार आहे. वारंवार मागणी करूनही या सरकारने याबाबत राज्यपालांकडे याबाबत माहिती दिली नाही. त्या आधारावर या सरकारला सभापतीपदाची निवडणूक घेण्यासाठी सूचना करा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याकडे केली. महाविकास आघाडीच्या या भूमिकेला राज्यपाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, या सरकारच हे शेवटच अधिवेशन असून  निरोपाचा अधिवेशन आहे, त्यामुळे सभापती पदाची निवडणूक लवकरात लवकर होणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले. या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे, गटनेते अजय चौधरी, अनिल परब, भास्कर जाधव, रमेश कोरंगावकर, सचिन अहिर, सुनिल शिंदे, ज.मो.अभ्यंकर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, शेकाप नेते जयंत पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :महाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडीरमेश बैस