मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या चौकटीत मांडलेल्या विचारांचे पालन करणारे आपले सरकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने संपादित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोअर्स मटेरियल खंड क्र. ३-१ ‘जनता’ या खंडाचे ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. यावेळी ते म्हणाले की, डॉ.आंबेडकर उत्तम कायदेपंडित होते. त्यांच्या विचाराने सर्व सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मोठी मदत झाली. त्यांचे विचार समजून घेत असताना, ते साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर येणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
यावेळी मंत्री उदय सामंत, नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ.लहू कानडे, वरिष्ठ अधिकारी ओ.पी. गुप्ता, डॉ.धनराज माने, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ.कृष्णा कांबळे, डॉ.भालचंद्र मुणगेकर सहभागी झाले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण केले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व इतर मान्यवरांनी देखील अभिवादन केले.
हा ग्रंथ म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं सोनं आहे. यामध्ये सर्व विषयांचा समावेश असून, कुठलंही पान उघडले, तर त्यांचे विचार यातून दिसतात. या विचाराचे प्रकाशन आज करत आहोत, हे भाग्य आहे. यातूनच त्यांची विद्वत्ता दिसून येते. ती पुस्तकीय नव्हती, तर अनुभवाची होती. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस, शौर्य बाबासाहेबांमध्ये होते, असेही ठाकरे म्हणाले.