Maharashtra Monsoon Session 2023: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही. त्यामुळे त्यांना पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली.
परिषदेच्या सभागृहात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हा घटनात्मक पेच सोडवावा, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. डॉ. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदावरून हटवा, अशी मागणी केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच हा पेच सुटेपर्यंत त्यांनी समिती नेमावी आणि कामकाज चालवावे, अशी मागणीही केल्याचे दानवे यांनी सांगितले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवावे
दरम्यान, विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधान परिषदेत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करत डॉ. नीलम गोऱ्हे यांना उपसभापतीपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. पक्षांतर केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. आणि सभापती नसल्यामुळे यावर निवाडा कोण करणार, असा सवालही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हल्ला परतवताना नोटीस दिल्याशिवाय हा मुद्दा उपस्थित करता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी विधानमंडळ सचिवांकडे डॉ. नीलम गोऱ्हे, विप्लब बाजोरिया तसेच प्रा. मनीषा कायंदे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. यावर काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.