Join us  

महाविकास आघाडीची १० मते फुटली!; काँग्रेसची सर्वाधिक मते फुटल्याची शंका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 7:36 AM

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची १२ मते फुटली.

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची १२ मते फुटली. सर्वाधिक काँग्रेसची मते फुटल्याची शंका  आहे.

महाविकास आघाडीकडे ६९ मते होती. यात काँग्रेस - ३७, उद्धव सेना - १५, शरद पवार गट - १२, शेकाप - १, समाजवादी पार्टी २, माकप - १ आणि अपक्ष १ यांचा समावेश होता. मात्र मविआच्या रिंगणात असलेल्या प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (उद्धव सेना) व जयंत पाटील (शेकाप) या तीन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५९ तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने सातव यांना पहिल्या पसंतीची २८ मते देण्याचे निश्चित केले होते. म्हणजे सातव यांना मतदान करण्यास सांगण्यात आलेल्या काँग्रेसच्या २८ आमदारांपैकी ३ आमदारांनी त्यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे स्पष्ट आहे. 

कोणत्या पक्षाची किती मते फुटली?

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर हे अप्रत्यक्षपणे अजित पवार गटात आहेत, त्यामुळे या तीन आमदारांसह जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान न करता महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्याचे बोलले जाते.

शरद पवार गट आपली १२ मते शेकापच्या जयंत पाटील यांना देणार होते. पाटील यांना पहिल्या पसंतीची १२ मते पडली आहेत, यात त्यांच्या पक्षाचे एक मत त्यांना मिळाले की फुटले आणि त्यांना ते मत मिळाले असेल तर शरद पवार गटाचे एक मत फुटले असण्याची शक्यता आहे.

उद्धव सेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची २२ मते मिळाली. या २२ मतांमध्ये उद्धव सेनेची १५ आणि काँग्रेसची काही मते होती, तर त्यांनी काही मते महायुती किंवा इतर लहान  पक्षांकडून घेतली असल्याची शक्यता आहे.  

टॅग्स :विधान परिषदमहाविकास आघाडीउद्धव ठाकरेशरद पवारनाना पटोले