Join us

मविआत काही जागांवर तिढा कायम; आज पुन्हा बैठक, आठवडाभरात जागावाटपावर अंतिम निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 8:17 AM

काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. मात्र त्यांना हव्या असणाऱ्या काही जागांवर उद्धवसेना तर काही जागांवर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत विदर्भ-मराठवाड्यातील जागांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत तिढा असलेल्या काही जागांवर एकमत झाल्याचे समजते. मात्र अजून काही जागांचा तिढा कायम असल्याने त्याबाबत मंगळवारी सकाळी पुन्हा बैठक होणार आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भात काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. मात्र त्यांना हव्या असणाऱ्या काही जागांवर उद्धवसेना तर काही जागांवर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. येत्या आठवडाभरात चर्चा पूर्ण करून जागावाटप अंतिम करण्याचा मानस असल्याचे एका नेत्याने सांगितले.

बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, उद्धवसेनेतर्फे संजय राऊत, अनिल देसाई, तर शरद पवार गटातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. 

 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४महाविकास आघाडी