महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:35 AM2024-01-26T08:35:03+5:302024-01-26T08:35:14+5:30

महाविकास आघाडीच्या बैठकीत काही मतदारसंघांबाबत अद्याप एकमत झालेले नाही.

Maha Vikas Aghadi seat allocation in final stage; The Thackeray group will contest four seats in Mumbai | महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ठाकरे गट मुंबईतील चार जागा लढवणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाला देण्याबाबतचा सूर या बैठकीचा होता. त्यापाठोपाठ काँग्रेस तसेच राष्ट्रवादीला (शरद पवार गट) जागा देण्यात या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार जागा ठाकरे गटाला सोडण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडीच्या बैठकीत काही मतदारसंघांबाबत अद्याप एकमत झालेले नाही. लोकसभेची जागा जिंकण्यासाठी तुल्यबळ उमेदवार ज्यांच्याकडे असेल त्या पक्षाला तो मतदारसंघ दिला जाईल. यासाठी काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते. मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यात महाविकास आघाडीतील वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी एक जागा सोडल्या जाणार आहेत. या दोन्ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोट्यातूनच दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

३० जानेवारीला पुढील बैठक

बैठकीनंतर महाविकास आघाडी मजबूत आणि एकसंघ असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर सकारात्मक चर्चा झाली. पुढील बैठक ३० जानेवारीला होईल. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाशिवाय सीपीआय, सीपीएमचे नेतेही उपस्थित होते. काही लोक देव पाण्यात घालून बसले असतील, त्यांना महाविकास आघाडीत सर्व काही सुखरूप असल्याचा संदेश द्या, असेही राऊत म्हणाले.

Web Title: Maha Vikas Aghadi seat allocation in final stage; The Thackeray group will contest four seats in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.