Join us

मविआचे जागावाटप पुढील आठवड्यात; ६ जागांचा तिढा, भारत जोडो न्याय यात्रेनंतर बैठका

By दीपक भातुसे | Published: March 15, 2024 5:31 AM

पुढील आठवड्यात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून त्यांच्या सहभागाबाबतही मविआ अंतिम निर्णय घेणार आहे.

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचे अडलेले घोडे पुढील आठवड्यात पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला शुक्रवारी शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यानंतर शनिवारी-रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या यात्रेत व्यस्त असणार आहेत, तर रविवारी शिवाजी पार्कवरील  मेळाव्यात मविआचे नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतरच जागावाटपाची चर्चा पुढे सुरू होईल. पुढील आठवड्यात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून त्यांच्या सहभागाबाबतही मविआ अंतिम निर्णय घेणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मविआचे ४८ पैकी ४२ जागांचे वाटप पूर्ण झाले असून यातील ४ जागा आंबेडकरांच्या वंचित आघाडीला देण्याचा प्रस्ताव तीन पक्षांनी ठेवला आहे. मात्र, त्याला वंचितकडून प्रतिसाद मिळालेला नाही. 

...तर ४८ जागांचा पर्याय खुला : आंबेडकर

मविआतील  १५ जागांवरचे भांडण मिटण्याची वाट मी पाहतोय, नाही तर माझा ४८ जागांचा पर्याय खुला आहे. संजय राऊत हे नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत? उबाठाचे, शरद पवारांचे की काँग्रेसचे? औरंगाबाद लोकसभेची जागा ही वंचितची असून ती आम्ही सोडणार नाही.

कोणत्या जागांवर तिढा ?

- सांगली मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. मात्र, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंनाही हवा आहे.

- कोल्हापूर मतदारसंघ आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे होता. यावेळी इथून शाहू महाराजांना उभे करण्याचा प्रस्ताव शरद पवारांनी ठेवला आहे. मात्र, शाहू महाराज काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे.

- उत्तर मुंबई, रामटेक मतदारसंघावर काँग्रेस आणि ठाकरे गटाने दावा सांगितला आहे.  

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाविकास आघाडीवंचित बहुजन आघाडी