Join us

महाविकास आघाडीला ५३ टक्के मते मिळणार..?

By अतुल कुलकर्णी | Published: June 05, 2023 9:58 AM

काँग्रेसच्या सर्वेक्षणात सर्वाधिक मते भाजपला मिळतील. मात्र मविआची एकत्रित मते ५० टक्क्यांच्या पुढे जातील, असे निष्कर्ष आले आहेत.

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

एक काठी मोडता येणे सहज शक्य आहे. मात्र वेगवेगळ्या काठ्या एकत्र केलेली मोळी तोडता येणे अशक्य आहे. राजकारणही त्याला अपवाद कसे ठरेल? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिघांची मिळून बनलेली महाविकास आघाडी नावाची मोळी एकत्रपणे तोडता येणे अशक्य आहे, हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे  या मोळीतल्या एकेक काठ्या बाजूला कशा करता येतील, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी एक सर्वेक्षण महाराष्ट्रात केले. काँग्रेसने स्वबळावर लोकसभा लढवली तर काय होऊ शकते आणि महाविकास आघाडी म्हणून लोकांसमोर गेले तर काय निकाल येऊ शकतो, असा तो सर्व्हे होता. त्यात महाविकास आघाडी म्हणून लढल्यास काँग्रेसला २३ टक्के, राष्ट्रवादीला १६ तर शिवसेनेला १४ टक्के मते मिळतील, असा निष्कर्ष आहे. 

महाविकास आघाडीच्या मतांची टक्केवारी ५३ टक्क्यांपर्यंत जाईल. त्याचवेळी एकट्या भाजपला २५% मते मिळतील. एकनाथ शिंदे गटाला ३ टक्के मते मिळतील, असे काँग्रेसचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे काहीही करून महाविकास आघाडीच्या नावाखालीच निवडणूक लढवायची ही मानसिकता काँग्रेसने केली आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातील काही नेते शिवसेनेच्या विरोधात बोलत होते. तेव्हा दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली. तेव्हापासून राज्यातील एकही नेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध बोलताना दिसत नाही. 

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना यांच्यात जागा वाटपावरून फार वाद होणार नाहीत. कारण दोघांच्या जागा वाटपात एकमेकांवर फारशी कुरघोडी नाही. मात्र राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात काही जागांवरून टोकाचे मतभेद होऊ शकतात. त्यात पुन्हा अजित पवार आयत्यावेळी काय करतील, याची शिवसेनेला खात्री वाटत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्याविषयी जे काही लिहिले, ती नाराजी ठाकरे यांनी उघडपणे बोलून दाखवली नसली तरी त्यांच्या मनात ती आहेच. त्यातूनच संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा दोघांसाठीही पोषक नाही. दुसरीकडे तेच संजय राऊत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याबद्दल अतिशय संयमाने लिहीत आहेत, बोलत आहेत. ‘बिटवीन द लाइन’ वाचणाऱ्यांना या हालचाली बरेच काही सांगून जातात. 

भाजपला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात काही ना काहीतरी वाद हवेच आहेत. त्या वादातून मोळीतल्या काही काठ्या आपल्याकडे वळवून घेता आल्या, तर त्या भाजपला हव्याच आहेत. काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये शिवसेनेला मुंबई कोकणात, राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात तर काँग्रेसला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात चांगले बळ मिळेल, असे सांगितले आहे. मात्र काँग्रेसचे विदर्भातील नेते प्रदेशाध्यक्षांवर खूश नाहीत. दोन दिवस मुंबईत झालेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर या नेत्यांनी पाठ फिरवली. काहीही करून त्यांना नाना पटोले यांचे नेतृत्व नको आहे. एच.के. पाटील पक्षाचे प्रभारी आहेत. ते कर्नाटकात मंत्री झाल्यामुळे प्रभारी पदावरून आपल्याला मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी केली. मात्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेपर्यंत आपण त्याच जागेवर राहा, असे सांगितल्याची चर्चा काँग्रेस नेत्यांमध्ये आहे. त्यावर त्यांनी आपण पटोले यांच्यासोबत काम करू शकत नाही, असे सांगितले. तेव्हा लवकरच त्यावर उपाय काढू, असे उत्तर खर्गे यांनी दिल्याचे काँग्रेसच्या एका गटाचे नेते सांगतात. दुसरीकडे एच. के. पाटील आता प्रभारी राहणार नाहीत. त्यांच्या जागी रमेश चेन्निथला हे केरळचे नेते येतील, असा दावा दुसरा गट करत आहे. काँग्रेसमधील हीच अंतर्गत गटबाजी काँग्रेसला अडचणीची ठरू शकते. अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे; तर यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्षपद घ्यावे, असा आग्रह काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीतून झाला. मात्र आयत्यावेळी त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात येते. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या वरिष्ठ पदांवरील ही अस्थिरता पक्षालाच अस्थिर करू शकते.

ज्यांना कोणाला जे पद द्यायचे असेल ते द्या, मात्र आता निवडणुकीच्या कामाला लागा, असे काही वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर काही नेत्यांनी स्वतःहून आपापले निर्णय घेणे सुरू केले आहे. प्रणिती शिंदे यांना लोकसभेवर जायचे आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेड, हिंगोली मतदारसंघासाठीचे उमेदवार निश्चित करून ठेवले आहेत. आतापासून जर नावांची निश्चिती केली, त्यांना तशी कल्पना दिली तर लोक काम करू लागतील. आयत्यावेळी उमेदवार दिल्यास काहीही होणार नाही, असा सूर ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी लावला आहे. विदर्भात काँग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता असताना, तेथील एकही नेता विद्यमान प्रदेशाध्यक्षांसोबत जायला तयार नाही. ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असेही या नेत्यांनी दिल्लीत सांगितले आहे. 

राज्याच्या राजकारणात होणाऱ्या बदलांचे परिणाम मुंबई महापालिकेतही होऊ शकतात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्याला पदावरून मुक्त करा, असे सांगितल्याचे त्यांच्या विरोधी गटाकडून मांडले जाते. काँग्रेसला ही गटबाजी नवीन नाही. एखादा नेता मुख्यमंत्री म्हणून पदावर बसला की, त्या क्षणापासून त्याचे पाय खेचण्याची मोहीम काँग्रेसमध्ये होत असते. त्यामुळे अशा गटबाजीची काँग्रेसला सवय आहे. असे असले तरी एकट्या भाजपला काँग्रेसच्याच सर्वेक्षणानुसार २५% मते मिळणार असतील, तर वेळीच आपले घर नीटनेटके करून घेतले पाहिजे. राज्यातल्या जुन्या जाणत्या नेत्यांची ही भावना दिल्लीश्वर कधी ऐकतील याकडे राज्याचे नेते लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या हातात तसेही दुसरे काहीही नाही.

 

टॅग्स :महाविकास आघाडी