महाबळेश्वरात आमदाराला धक्काबुक्कीचा प्रकार
By admin | Published: May 28, 2017 11:43 PM2017-05-28T23:43:00+5:302017-05-28T23:43:00+5:30
महाबळेश्वरात आमदाराला धक्काबुक्कीचा प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : राज्यात टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची दंडेली वाढत चालली असताना महाबळेश्वर येथील टोल नाकातरी त्याला कसा अपवाद राहील असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, चेंबूर येथील शिवसेनेचे आ. तुकाराम काते हे महाबळेश्वर येथे आले असता त्यांना टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा अनुभव आला. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आ. काते यांना धक्काबुक्की तर केलीच परंतु त्यांच्या मुलाला मारहाण व सुनेलाही धक्काबुक्कीही केली. या प्रकरणी महाबळेश्वर पोलिसात संबंधित टोल (वनविभागाच्या) नाक्याच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाबळेश्वर येथील वेण्णालेक येथे एकाच ठिकाणी दोन टोल नाके आहेत. वन विभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने तसेच पालिकेच्या वतीने त्यांचे कर्मचारी पर्यटकांकडून प्रवेशकर व प्रदुषण कर वसूल करतात. मुंबई येथील आ. तुकाराम काते महाबळेश्वर सहलीवर आले होते. रांगेत ते आपले वाहन घेऊन हळूहळू पुढे जात होते. त्यांची गाडी पुढे आली तेव्हा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा कर्मचारी पुढे आला व सरळ त्यांच्या गाडीच्या बॉनेटवर हात आपटला व टोलची मागणी केली. आ काते यांच्या चालकाने संबंधित कर्मचाऱ्याला अरे गाडीत आमदार आहेत, तुु गाडीवर हात आपटू नको असे सांगितले. तर त्याचवेळी काते यांनी गाडीवर हात आपटलेल्या कर्मचाऱ्यास डाव्या बाजुला बोलावून घेतले. आमदार असो किंवा आणखी कोणी तुम्ही टोल द्या व पुढे जा असे म्हणत तो डाव्या बाजुला आला व आ. काते बसलेल्या खिडकीच्या काचेवर हात मारू लागला. काचेवर मारलेला हात काते यांच्या चष्म्याला लागला. तेव्हा काते यांचा मुलगा गणेश व चालक हे गाडीतून खाली उतरले. यावेळी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. याचवेळी टोल नाक्यावरील पंधरा ते वीस कर्मचारी तेथे आले. यातीलच काहीजणांनी काते यांच्या मुलाला व चालकाला मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करणाऱ्यांच्याविरोधात तक्रार नोंद केली आहे. पोलिसांनी आकाश संतू झाडे (वय २४) व मनिष विजय झाडे (वय २६, दोघेही रा. क्षेत्र महाबळेश्वर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चूक मान्य...
आमदार काते मारहाण प्रकरणात वन व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे येथील वनक्षेत्रपाल सूर्यकांत कुलकर्णी यांनी मान्य केले व त्यांनी पोलिस ठाण्यात काते यांची कर्मचाऱ्यांच्या वतीने माफी मागितली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र राजमाने, शिवसेनेचे विजय नायडु उपस्थित होते.