मुंबई : महाबँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी डेप्युटी चिफ लेबर कमिशनर मुंबई यांनी केलेली मध्यस्थी विफल झाल्यामुळे अखेर २७ सप्टेंबरचा संप अटळ आहे. महा बँकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्रित येऊन प्रथमच संपाची हाक दिली आहे.
२७ सप्टेंबरनंतर २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या संपाची हाक संघटनांतर्फे देण्यात आली आहे. दरम्यान, बँकेतील दोनही अधिकारी संघटनांनी २७ सप्टेंबरच्या संपाला पाठिंबा जाहीर करीत कर्मचारी संघटनांशी समन्वयाने त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले की, बँकेत सफाई कर्मचारी, तसेच शिपायांची अनेक पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून जे या पदावर तात्पुरते कर्मचारी म्हणून काम करीत आहेत त्यांना सेवेत सामावून घ्यावे व ही रिक्त पदे भरावीत अशी संपकरी संघटनांची मागणी आहे. याशिवाय बँकेने अनेक वर्षांपासून मृत्यू, निवृत्ती, राजीनामा, पदोन्नती या कारणांमुळे रिकाम्या झालेल्या लिपिक पदाच्या रिक्त जागादेखील भरलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. मधल्या काळात जनधन, सामाजिक सुरक्षितता विमा योजना, पेंशन योजना, मुद्रा यासारख्या योजनांमुळे कामांचा ताण वाढला आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने त्वरित लिपिकांची भरती करावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.