लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड काळात लांबणीवर पडलेल्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) कामाला अखेर वेग मिळाला आहे. आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या या प्रकल्पांतर्गत दोन महाबोगद्यांचे काम सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे. यासाठी देशातील सर्वात मोठ्या ‘टनेल बोअरिंग मशीन’चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम जलदगतीने होऊन २०२३ पर्यंत कोस्टल रोड तयार होईल, असा पालिकेचा दावा आहे.
प्रिंन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ कि.मी.चा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन गेल्या वर्षी मुंबईत आणण्यात आले. १२.१९ मीटर व्यासाच्या या मशीनच्या साहाय्याने प्रियदर्शनी पार्क येथून बोगदा खोदण्यास सुरुवात झाली. बाेगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरीन ड्राइव्ह) असणाऱ्या छोट्या चौपाटीपर्यंत असतील. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जातील. बाेगदे जमिनीखाली १० ते ७० मीटर असतील. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ कि.मी. असेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या महाबोगद्याच्या कामाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट, एल अँड टी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष एस. व्ही. जोशी यांच्यासह मान्यवर, अधिकारी उपस्थित होते. १३ हजार कोटी रुपये खर्च करुन पालिका स्वबळावर कोस्टल रोडचे काम पूर्ण करणार आहे. इतक्या मोठ्या रकमेचा प्रकल्प राबवणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका असल्याचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.
..........................