Join us

महाड दुर्घटना - सलग तिस-यादिवशी शोधकार्य सुरु

By admin | Published: August 05, 2016 7:38 AM

महाडच्या सावित्री नदीमध्ये सुरु असलेल्या शोधकार्यात पावसामुळे अडथळा येत आहे. शोधकार्याचा आजचा तिसरा दिवस आहे.

ऑनलाइन लोकमत 

पोलादपूर, दि. ५ - महाडच्या सावित्री नदीमध्ये पुन्हा शोधकार्य सुरु झाले आहे. सकाळी पावसामुळे शोधकार्यात अडथळा आला होता.  शोधकार्याचा आजचा तिसरा दिवस असून, रात्रभर महाड परिसरात पावसाची संततधार सुरु होती. सकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते.
 
काल गुरुवारी दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह सापडले. पण बेपत्ता असलेल्या वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड-पोलादपूरला जोडणारा सावित्री नदीवरील जुना ब्रिटीश कालीन पूल मंगळवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ४२ जण बेपत्ता झाले. 
 
दोन एसटी बससह काही वाहने  सावित्रीच्या प्रवाहात वाहून गेली. १४ मृतदेहांची ओळख पटली आहे. आज उर्वरित २८ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येईल. पावसाचा जोर आणि सावित्री नदीची धोकादायक पातळी यामुळे शोधकार्याला अद्याप अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदलाचे जवान जोरदार प्रवाहातही प्रचंड मेहनत घेत आहेत. 
 
काल प्रवाहाच्या वेगामुळे एनडीआरएफ जवानांची बोट उलटली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही. महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर गुरुवारी  दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडला. घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.