बिरवाडी : महाड शहरासह तालुक्यात सोमवारी दुपारनंतर झालेल्या चक्रीवादळात कुसगाव, कुर्ले, आंबवडे, विन्हेरे येथील सुमारे ४० घरांचे अतोनात नुकसान झाले. कुसगाव येथील घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. वादळाने तालुक्यातील बिरवाडी, महाड व विन्हेरे भागात विजेचे खांब, वाहिन्या पडल्याने अनेक गावात वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे महाड शहरासह कुर्ले व कुसगांव येथील विठ्ठल नामदेव शिंदे, रवींद्र मारुती कदम, परशुराम पांडुरंग राणे, ज्ञानेश्वर पवार, अनंत महादेव पाटेकर, राजेश गंगाराम पाटेकर, मिथुन महादेव पाटेकर, संतोष सुर्वे, दिलीप बाबाजी सकपाळ यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कुसगांव येथील मूळ रहिवासी आणि सध्या दमण येथे नोकरीनिमित्त असणाऱ्या विठ्ठल शिंदे व सैन्यदलात असणाऱ्या परशुराम पांडुरंग राणे यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. राणे यांच्या घरात बुधवारी लग्नकार्य असल्याने या दुर्घटनमुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. कुसगांवची ग्रामदैवत असणाऱ्या धर्मशाळेचीही कौले उडाल्याचे आढळून आले आहे. कुर्ले येथे स्थानिक तलाठी सुदर्शने यांनी पंचनामा केल्याची माहिती संदीप सकपाळ यांनी दिली. मात्र महाड शहरापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कुसगांव गावातील पंचनाम्यासाठी प्रशासन यंत्रणा सकाळी ११ वा. पर्यंत पोहचली नव्हती. या संदर्भात तहसीलदार संदीप कदम यांनी तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल २४ तासांच्या आत सादर करावेत, असे आदेश दिले आहेत. गतवर्षी वादळाच्या नुकसानभरपाईची रक्कमही आपादग्रस्तांना अद्याप न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी कुसगांव शिंदेवाडीतील स्थानिक पंचायत समिती सदस्य किसन ऊर्फ आप्पा सकपाळ यांनी येथील समस्या मांडल्या. (वार्ताहर)
महाडला वादळी वाऱ्याचा फटका
By admin | Published: April 21, 2015 10:39 PM