Join us

महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 6:01 AM

या प्रकरणातील गुन्ह्यात अंदाजे ५००० कोटी रुपयांची संपत्ती जमवण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई, नवी दिल्ली : ऑनलाइन ॲपद्वारे सामान्य लोकांना पाच हजार कोटींचा गंडा घातलेला महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याच्या हातात अखेर बेड्या पडल्या आहेत. ईडीने इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटिस जारी केल्यानंतर युएईतील तपास यंत्रणांनी त्याला अटक केली आहे. वर्षभरापासून तो आणि त्याचा साथीदार रवी उत्पल हे नजरकैदेत होते. त्याला अटक केल्यानंतर ईडीने त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. आठवडाभरात त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 

महादेव ॲपच्या मालकांनी सट्टेबाजीसाठी ६० ॲपची निर्मिती केली होती. या ॲपची सर्व सुत्रे दुबईतून हलविण्यात येत होती. मात्र, त्याच्या प्रसारासाठी भारतात तब्बल दोन हजार ऑपरेटरची नेमणूक त्यांनी केली होती. महादेव ॲपच्या मालकांना या प्रत्येक ॲपच्या माध्यमातून महिन्याकाठी ४० लाखांपर्यंत नफा मिळत होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, कोलकाता, भोपाळ येथे ३९ ठिकाणी छापेमारी केली होती व कंपनीची तब्बल ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तर, महादेव ॲपच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या हजारो कोटी रुपयांपैकी एक हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम भारतीय शेअर बाजारात गुंतवल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली असून, त्या अनुषंगाने ईडीच्या तपासाची चक्रे फिरत असल्याची माहिती आहे.

५,००० कोटींची माया जमवली

या प्रकरणातील गुन्ह्यात अंदाजे ५००० कोटी रुपयांची संपत्ती जमवण्यात आले, असा दावा ईडीने केला आहे. चंद्राकरने फेब्रुवारी २०२३ मध्ये रास अल खैमाह (यूएई) येथे लग्न केले आणि त्यासाठी २०० कोटी रोख खर्च केले. चंद्राकरच्या नातेवाइकांना भारतातून युएईला नेण्यासाठी त्यांनी १०० पेक्षा जास्त खासगी जेट भाड्याने घेतले होते. एकाचवेळी दुबईत एवढी खासगी विमाने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या आणि तेथूनच त्याच्या गैरव्यवहाराची माहिती पुढे येऊ लागली. या लग्नात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजर होते. त्या सर्वांना रोखीने मानधन देण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.

 

टॅग्स :धोकेबाजीअंमलबजावणी संचालनालय