भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 06:18 AM2024-03-12T06:18:25+5:302024-03-12T06:20:29+5:30

महादेव जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. 

mahadev jankar contact with sharad pawar and what about bjp small allies | भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच 

भाजपच्या लहान मित्रपक्षांना काय? जानकर-पवारांच्या संपर्कात, आठवलेंच्या हाती भोपळा तरी सोबतच 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत  त्यांच्या मागणीपेक्षा भाजप फार कमी जागा देणार असे म्हटले जात असताना लहान मित्रपक्षांना भोपळा मिळणार असे चित्र आहे. 

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे काही जागांची मागणी केली होती, पण ती अमान्य करण्यात आल्याने आता जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते रासपचे उमेदवार होते आणि भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

जानकर यांनी आता भाजपला कंटाळून महाविकास आघाडीशी चर्चा सुरू केली आहे. आम्ही मविआला परभणी, सांगली व माढाची जागा मागितली आहे, असे जानकर यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

सध्याचे राहू द्या... विधानसभेत बघू...

- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाला भाजप जागा देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जागा देऊ या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात आल्याचे समजते. 

- विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतरही शिवसंग्राम हा त्यांचा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र, लोकसभेची एकही जागा भाजपकडून त्यांना मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. 

- कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचाही उमेदवारीबाबत भाजपने विचार केला नसल्याचे सध्याच्या हालचालींवरून स्पष्ट होते. 

- सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वातील रयत क्रांती संघटनेचीही तीच अवस्था आहे. 

- बडनेराचे आमदार रवी राणा यांचा पक्ष युवा स्वाभिमानी हा भाजपसोबत आहे. त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांना अमरावतीत भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

 

Web Title: mahadev jankar contact with sharad pawar and what about bjp small allies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.