महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला; महायुतीला धक्का देण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 12:19 PM2024-03-15T12:19:22+5:302024-03-15T12:23:23+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासपचे नेते महादेव जानकर खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
Sharad Pawar ( Marathi News ) : मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासपचे नेते महादेव जानकर खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. वाय बी चव्हाण सेंटवर ते भेट घेणार आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. रासप आता या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणार का अशा चर्चा सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापासून महादेव जानकर माढा लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक होते. दरम्यान, भाजपची लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत भाजपने माढा लोकसभेसाठी रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, यामुळे महादेव जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यामुळे आता जानकर महायुतीमधून बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
इलेक्टोरल बाँड: एसबीआयने लपविले, चंद्रचूड यांनी नेमके तेच पकडले; नंबरही जारी करण्याचे दिले आदेश
महादेव जानकर यांच्या या भेटीत माढा लोकसभेची चर्चा होऊ शकते. जर महादेव जानकर महाविकास आघाडीमध्ये गेले तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर मोठा परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे. जानकर हे गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय समाज पक्षाने भाजपकडे काही जागांची मागणी केली होती, पण ती अमान्य करण्यात आल्याने आता जानकर हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. जानकर यांनी २०१४ मध्ये बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते रासपचे उमेदवार होते आणि भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.