Join us  

विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही, महादेव जानकर नाराज? माजी मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 12:46 PM

Mahadev Jankar : विधान परिषदेची ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे, यामुळे आता निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Mahadev Jankar ( Marathi News ) : विधान परिषदेत ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री महादेव जानकर यांनाही विधान परिषदेची उमेदवारी मिळणार या चर्चा होत्या. पण, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. यामुळे जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर स्वत: महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिल्या असून नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  

"मी दोन टर्म विधान परिषदेत काम केलं आहे. आता वरचा मार्ग बघितला पाहिजे, मी नाराज नाही. आमच्या पक्षाची महायुतीबरोबर युती आहे. जनतेने आम्हाला कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. पुन्हा आमचा पक्ष कधी वाढेल त्यासाठी काम करणार आहे. मी स्वत: आता विधानसभा निवडणूक लढणार नाही, असंही महादेव जानकर म्हणाले. 

नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा; वडेट्टीवारांना वेगळा संशय

पंकजा मुंडे यांनी काल विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, पंकजा मुंडे यांचा अर्ज भरताना मी सोबत होतो. ती माझी बहिण आहे. ती माझी बहिण असल्यामुळे काही अडचण नाही, असंही जानकर म्हणाले. 

विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन दिवसापूर्वी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून अपशब्द पावरल्याचे पाहायला मिळाले, यावरही महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर म्हणाले,  "ज्या ज्या सभागृहाचा अवमान होऊ नये म्हणून असं वाक्य प्रत्येक सदस्याने वापरले पाहिजे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेची, विधान सभेची गरीमा वेगळी आहे. त्यामुळे आम्ही जबाबदार सदस्यांनी योग्य वर्तन केले पाहिजे. किंवा योग्य दृष्टीने चर्चा केली पाहिजे, त्यामुळे सदस्यांनी योग्य बोललं पाहिजे, अशी विनंतीही महादेव जानकर यांनी केली.

कोटा २३ मतांचा

विधानसभेचे संख्याबळ २७४ इतके आहे. विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मतांचा कोटा २३ वर आला आहे.  विधानसभेत काँग्रेसचे ३७, उद्धवसेनेचे १५ आणि शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख उद्धव सेनेसोबत आहेत. त्यामुळे आघाडीचे संख्याबळ ६६ पर्यंत जाते. आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज असल्याने आणखी तीन  मतांसाठी आघाडीची  मदार समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट पक्ष या छोट्या पक्षांवर  तसेच अपक्ष आमदारांवर आहे.  दोन वर्षांपूर्वी झालेल्या काँग्रेसची मते फुटून काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे काँग्रेस २३पेक्षा जास्त मतांचा कोटा निश्चित करू शकते. त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव सेनेला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची तजवीज करावी लागू शकते.

टॅग्स :महादेव जानकरभाजपाविधानसभा