मुंबई - लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाकडून महाराष्ट्रातील २३ उमेदवारांची घोषणा झाली आहे. तर, काँग्रेसकडून १२ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाने अखेर प्रतिभा धानोरकर यांना भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहे. तर, सोलापुरात प्रणिती शिंदेंविरुद्ध भाजपाने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघात भाजपाने उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात येणार होती. यासंदर्भात जानकर यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती. मात्र, ऐनवेळी जानकरांनी पलटी मारली अन् महायुतीत सहभागी झाले. त्याचं मतपरिवर्तन अचानक कसं झालं, यावरही त्यांनी भाष्य केलं.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी अचानक यु-टर्न घेऊन सर्वांनाच धक्का दिला. विशेष म्हणजे दोन तासांपूर्वी माढ्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला म्हणून ज्यांचं नाव होतं, त्याच महादेव जानकरांनी महायुतीत पुन्हा घरवापसी केली. तसेच, जानकर यांच्या रासप पक्षाला लोकसभेची एक जागाही देण्यात येणार असल्याची घोषणा महायुतीने केली आहे. त्यानंतर, जानकर यांनी प्रतिक्रिया देताना, शरद पवारांचे आभार मानले. मात्र, आपण महायुतीत परतल्याचेही स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात होत असलेला विकास पाहून आपण महायुतीत परतल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले. मात्र, देवेंद्र फडणवीस हे माझे जुने मित्र आहेत, तर पंकजा मुंडे या माझ्या भगिनी आहेत. यांच्या मध्यस्थीनेच आपण पुन्हा महायुतीत आलो आहोत, असे जानकर यांनी स्पष्ट केले. मात्र, शरद पवार यांनी मला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ केली होती. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आता, महायुतीनेही आम्हाला एक जागा दिली आहे. त्यामुळे, आता एका जागेवर आम्ही लढणार आहोत. मात्र, ती जागा परभणीची असेल की माढ्याची याबाबत दोन दिवसांत कळेल, असेही जानकर यांनी स्पष्ट केले. मात्र, जानकरांनी अचानक यु-टर्न घेतल्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
दरम्यान, महादेव जानकर यांनी अनेकदा भाजपाबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तर, पंकजा मुंडेंनाही डावललं जात असल्यावरुनही त्यांनी भाजपावर टीका केली होती. आता, भाजपाने पंकजा मुंडेंना तिकीट जाहीर केल्यानंतर जानकर यांनाही जवळ केले आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंसोबतचं नातं सांगत जानकरांनी फडणवीसांची मैत्रीही घरवापसीसाठी निमित्त असल्याचे म्हटले.
महायुतीकडून निवेदन
महादेव जानकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असं महादेव बैठकीत सांगितलं. या बैठकीत महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असंही महादेव जानकर यांनी यावेळी सांगितलं आहे," असं महायुतीच्या या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. या निवदेनाच्या खाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महादेव जानकर यांचीही सही आहे.