माथाडींना महावितरणचा दिलासा

By Admin | Published: March 16, 2015 01:50 AM2015-03-16T01:50:18+5:302015-03-16T01:50:18+5:30

महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर महावितरणने माथाडींना मोठा दिलासा दिला आहे. माथाडींच्या कोपरखैरणेतील घरांना वाढीव मजल्याप्रमाणे स्वतंत्र विद्युत मीटर देण्यास

Mahadevani's relief from Mathadi | माथाडींना महावितरणचा दिलासा

माथाडींना महावितरणचा दिलासा

googlenewsNext

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर महावितरणने माथाडींना मोठा दिलासा दिला आहे. माथाडींच्या कोपरखैरणेतील घरांना वाढीव मजल्याप्रमाणे स्वतंत्र विद्युत मीटर देण्यास महावितरणने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे भरमसाट विद्युत बिलापासून माथाडींची सुटका होणार आहे. परिसरातील जवळपास पंचवीस हजार कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
कोपरखैरणे विभागात रेल्वे प्रकल्पग्रस्त व माथाडी कामगारांसाठी सिडकोने जवळपास अकरा हजार बैठ्या घरांचे वाटप केले आहे. कालांतराने अनेकांनी या बैठ्या घरांचा पुनर्विकास करताना त्याला निचे दुकान व उपर मकान असे स्वरूप दिले आहे, तर काहींनी तळमजला अधिक दोन मजले चढविले आहेत. या परिसरातील सुमारे ८0 टक्के सदनिकाधारकांनी अशाप्रकारे वाढीव बांधकामे केली आहेत. वाढीव बांधकामांतून तयार झालेल्या या अतिरिक्त खोल्या भाडेतत्त्वावर देवून अनेक सदनिकाधारक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. असे असले तरी आतापर्यंत या सदनिकेला नियमानुसार एकच विद्युत मीटर दिले जात असे. त्यामुळे तळमजला अधिक दोन मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबीयांना विभागून विद्युत देयक भरावे लागत असे. हे बिल भरमसाट असल्याने संबंधितांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. कष्टकरी रहिवाशांची ही आर्थिक लूट थांबविण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक शिवराम पाटील यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र विविध कारणांमुळे मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे राहिला होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर पाटील यांनी या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पुन्हा एकदा कंबर कसली होती. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असून, सुमारे पंचवीस हजार कुटुंबीयांना त्याचा लाभ होणार आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुसंवाद कार्यक्रमात पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवून पालकमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार यापुढे घराच्या वरच्या मजल्यांनाही मागणीप्रमाणे स्वतंत्र विद्युत मीटर देण्याचे महावितरणने मान्य केले आहे. तशा आशयाचे पत्र शिवराम पाटील यांना देण्यात आले आहे. अर्जदारांनी राहत असलेल्या जागेचा आवश्यक तपशील घेवून विभागीय कार्यालयात अर्ज केल्यास स्वतंत्र विद्युत मीटर जोडून दिले जाईल, असेही महावितरणने या पत्राद्वारे कळविले आहे. दरम्यान, या निर्णयाचा फायदा कोपरखैरणेच नव्हे, तर सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध विभागात अल्प उत्पन्न घटकांसाठी उभारण्यात आलेल्या बैठ्या चाळींनाही होणार आहे.

Web Title: Mahadevani's relief from Mathadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.