Join us

महाडची ‘ती’ निवडणूक स्मरणीय

By admin | Published: September 23, 2014 11:36 PM

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी समान मते उमेदवारांना मिळण्याची घटना दुर्मीळच म्हणावी लागेल.

महाड : स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य संस्थांच्या निवडणुका दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर चिठ्ठी टाकून उमेदवार विजयी घोषित होण्याच्या घटना अनेकवेळा घडत असत असतात. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशी समान मते उमेदवारांना मिळण्याची घटना दुर्मीळच म्हणावी लागेल. १९६२ मध्ये महाड विधानसभा मतदार संघात झालेली निवडणूक याच कारणाने चिरस्मरणीय ठरली.या निवडणुकीत एकूण ५८ हजार १६२ मतदारांपैकी ३४ हजार १३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात होते. विविध आरोप प्रत्यारोपांनी त्यावेळीही निवडणूक चांगलीच गाजली होती. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. शंकरराव बाबाजीराव तथा शं. बा. सावंत हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवीत होते. तर प्रजासमाजवादी पक्षाचे सखाराम विठोबा साळुंखे यांनी सावंत यांच्यासमोर चांगलेच आव्हान उभे केले होते. र. बा. मोरे (संयुक्त महाराष्ट्र समिती), लक्ष्मणराव मालुसरे (जनसंघ), बा. गो. मोरे (स्वतंत्र) हे देखील निवडणूक रिंगणात होते. विविध कारणांनी चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोण विजयी होणार याची खात्री कोणीच देवू शकत नव्हते. मतदानानंतर प्रत्यक्ष मोजणीत आश्चर्यकारक घटना घडली. शं. बा. सावंत आणि सखाराम साळुंखे यांच्यात निकालाच्या प्रत्येक फेरीत चुरस होती ती शेवटच्या फेरीपर्यंत तशीच राहिली. अखेर या दोन्ही उमेदवारांना १२ हजार ६६४ अशी समान मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला. दोन वेळा फेरमोजणी झाली तरी तशीच स्थिती कायम राहिली. सावंत आणि साळुंखे यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठ्या टाकून निकाल घोषित करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला आणि त्यावेळी शं. बा. सावंत यांच्या बाजूने नशिबाने कौल दिल्याने सावंत यांना विजयी घोषित करण्यात आले. दोन दिवस ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीच्या वेळी पोलादपूर तालुक्यातील एका मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्याने उशिरा आलेल्या १९ मतदारांच्या मतपत्रिका मतदार केंद्रस्थानी बंद लखोट्यात ठेवल्या होत्या. मात्र या मतपत्रिकांची मतमोजणी करता येणार नसल्याचा त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्याने या १९ मतपत्रिकांची मोजणी होवू शकली नाही.