बीकेसीत आजपासून महालक्ष्मी सरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:51 AM2018-01-17T04:51:39+5:302018-01-17T04:52:19+5:30
ग्रामीण भागातील उत्पादने, नावीन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थांनी मुंबईकरांना भुरळ घालणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन बुधवारपासून सुरू होत आहे.
मुंबई : ग्रामीण भागातील उत्पादने, नावीन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थांनी मुंबईकरांना भुरळ घालणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन बुधवारपासून सुरू होत आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यंदा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. १७ ते २९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन चालणार असून यात महिला बचतगटांचे तब्बल ५११ स्टॉल्स असतील. यापैकी ७० स्टॉल्स हे खाद्यपदार्थांचे असल्याची माहिती ग्रामविकास आणि महिला - बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी दिली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे म्हणाल्या की, यंदा आॅनलाइन पद्धतीने स्टॉल वाटप करण्यात आले असून महाराष्ट्रासोबतच देशातील २८ राज्यांतील स्वयंसाहाय्यता गट प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वयंसाहाय्यता गटांनी तयार केलेल्या वस्तू, उत्पादने, साहित्य, नावीन्यपूर्ण कला व खाद्यपदार्थ सहजपणे
शहरी नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. यंदा प्रदर्शनात एकूण
५११ स्टॉल सहभागी होणार
असून यातील ७० खाद्यपदार्थांचे आहेत. ग्रामीण महिलांनी व कारागिरांनी तयार केलेल्या
विविध कलाकुसरीच्या वस्तू,
अस्सल ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. दररोज सायंकाळी ग्रामीण भागातील विविध लोककलांचे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.