माहिमची महाकाली देवी :त्वष्टा कासारांची कुलदेवता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:08 AM2019-09-30T02:08:58+5:302019-09-30T02:09:10+5:30
मुंबईत त्वष्टा कासार ज्ञाती समाज हा विविध भागांत वास्तव्यास आहे.
- राज चिंचणकर
मुंबई : मुंबईत त्वष्टा कासार ज्ञाती समाज हा विविध भागांत वास्तव्यास आहे. या ज्ञातीची कुलदेवता म्हणून महाकाली देवी ओळखली जाते. माहिमच्या वीर सावरकर मार्गावर महाकालीचे मंदिर आहे. समस्त त्वष्टा कासार समाज महाकाली देवीचा उपासक आहेच, परंतु त्याचबरोबर इतर ज्ञातींचे भाविकही या देवीचे भक्त आहेत.
त्वष्टा कासार महाकाली संस्थानाची स्थापना १२६ वर्षांपूर्वी करण्यात आली असून, पूर्वी या ठिकाणी बैठे मंदिर होते. सन १९४० मध्ये शहर सुधारणेच्या कामामुळे महानगरपालिकेने या मंदिराचा पुढील भाग रस्त्याच्या विकासाकरिता ताब्यात घेतला. येथील मूळ मंदिर पाडून तिथे नवीन मंदिर उभारले गेले. सर्वसाधारणपणे मंदिरे तळमजल्यावर असतात, परंतु महाकालीचे मंदिर मात्र याला अपवाद असून, ते पहिल्या मजल्यावर आहे. महाकाली मंदिराच्या सभोवती इमारती असल्या, तरी या मंदिरात भरपूर उजेड व खेळती हवा असल्याने या मंदिरात कायम पावित्र्य जाणवते. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच महाकालीची संपूर्ण काळ्या पाषाणातील प्रसन्न मूर्ती दर्शन देते़