लॉकडाऊनमध्ये महाकार्गोची महाभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:16+5:302021-05-21T04:06:16+5:30
एसटीने वर्षभरात मालवाहतुकीतून मिळवला ५६ कोटींचा महसूल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या ...
एसटीने वर्षभरात मालवाहतुकीतून मिळवला ५६ कोटींचा महसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एसटी महामंडळाच्या महाकार्गोने अवघ्या वर्षभरात महाभरारी घेतली. खासगी वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत किफायतीशीर दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या महाकार्गोने गेल्या वर्षभरात मालवाहतुकीसाठी १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार करत महामंडळाच्या तिजोरीत ५६ कोटींचा महसूल जमा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्यावर्षी लॉकडाऊन घोषित केला होता. शासनाच्या कडक निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मे २०२० पासून राज्यभरात माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली. महांडळाच्या मालवाहतुकीचे ट्रक महाकार्गो नावाने रस्त्यावर धावू लागले.
मालवाहतुकीसाठी एसटीच्या ताफ्यात महाकार्गोचे १,१५० ट्रक आहेत. महाकार्गोने आतापर्यंत ९५ हजार फेऱ्यांच्या माध्यमातून ७ लाख मेट्रिक टन मालाची वाहतूक केली असून तब्बल १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. महामंडळाने पुढील वर्षभरात मालवाहतुकीतून १०० कोटी रुपयांपर्यंत महसुलाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, विविध शासकीय विभागामार्फत खासगी मालवाहतूकदारांकडून जी मालवाहतूक करण्यात येते त्यातील २५ टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
* यासाठी होतो महाकार्गो ट्रकचा उपयोग
शासनाच्यावतीने रेशनिंगवर पोहोचविला जाणारा अन्नधान्यांचा पुरवठा, बी-बियाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, खासगी कंपन्या याचबरोबर कोकणातील आंबा बागायतदार तसेच सिमेंट कंपन्यांच्या मालाच्या वाहतुकीसाठी महाकार्गो ट्रकचा उपयोग करीत आहेत.
....................................