मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि लोअर परळ या स्थानकांवरील पादचारी पूल आजपासून बंद करण्यात येणार आहे. तर, मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार आणि हार्बर मार्गावरील जीटीबी नगर स्थानकातील पादचारी पूल मंगळवार, ३० एप्रिल रोजी बंद करण्यात येणार आहे. पादचारी पुलाची दुरुस्ती करण्यासाठी हे पूल बंद करण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी स्थानकावर विरार दिशेकडचा पादचारी पूल दुरुस्तीसाठी २८ एप्रिल ते १२ मे पर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांनी चर्चगेट दिशेकडील नव्या पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तर, लोअर परळ स्थानकातील जुन्या पादचारी पुलाच्या ठिकाणी नवीन १० मीटर रुंदीचा पादचारी पूल उभारला आहे. तो प्रवाशांसाठी खुला केला आहे. आता विरार दिशेकडील पादचारी पूल २८ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार स्थानकावरील सीएसएमटी दिशेकडील ‘एन’ आकारातील पादचारी पुलाचा फलाट क्रमांक १ व २ ला जोडणारा भाग व पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपासून विद्याविहारचा हा भाग बंद करण्यात येणार आहे. प्रवाशांनी नवीन पादचारी पुलाचा वापर करावा. तसेच मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे स्थानकातील पे अॅण्ड पार्कच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू होणार असल्याने सीएसएमटी दिशेकडील पादचारी पुलाच्या फलाट क्रमांक १ वर उतरणारे जिने दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. २७ एप्रिलपासून २६ मेपर्यंत हा पूल बंद राहील. फलाट क्रमांक १ वर जाण्यासाठी सरकत्या जिन्यांचा वापर करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूरनगर स्थानकातील कुर्ला दिशेकडील पुलाची दुरुस्ती होणार आहे. त्यामुळे पुलावरील पूर्वेला उतरणाºया आणि फलाट क्रमांक १ व २ वरील जिने ३० एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहेत.