महालक्ष्मी सरस ही एक चळवळच
By admin | Published: January 18, 2016 02:45 AM2016-01-18T02:45:51+5:302016-01-18T02:45:51+5:30
बचत गटांचे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन हे केवळ ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे व खाद्य पदार्थांचे विक्री-प्रदर्शन नसून ही एक महिला
मुंबई : बचत गटांचे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन हे केवळ ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे व खाद्य पदार्थांचे विक्री-प्रदर्शन नसून ही एक महिला सक्षमीकरणाची चळवळ आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणारी ही एक शांततापूर्ण क्रांतीच असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी काढले.
राज्याच्या ग्राम विकास विभागाततर्फे आयोजित केलेल्या १३व्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते वांद्रे येथील म्हाडा ग्राउंडवर झाले. त्याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या महिलांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.
ग्राम विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आज तंत्रज्ञान, इंटरनेट व ई-कॉमर्सच्या माध्यमातून सर्व जग जवळ आले आहे. महिला बचत गटदेखील या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपली उत्पादने घरबसल्या विकू शकतात, असे सांगत महिलांनी आता स्वयंम् उद्योजक होऊन राष्ट्र-निर्माण कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
राज्यातील प्रत्येक मॉलमध्ये महिला बचत गटांची उत्पादने ठेवण्यासाठी जागा राखून ठेवण्याचा शासनाचा निर्णय झाला असून, बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णयदेखील सरकारच्या विचाराधीन असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये महिला बचत गटांची उत्पादने विकण्यासाठी विक्री केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचे दीपक केसरकर यांनी या वेळी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते विविध महिला बचत गटांना विभागीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात आले. राज्यपालांनी या प्रदर्शनातील काही स्टॉल्सना भेट दिली. (प्रतिनिधी)