‘महालक्ष्मी’ आराखडा निधी रखडलेलाच

By admin | Published: July 22, 2014 12:14 AM2014-07-22T00:14:11+5:302014-07-22T00:42:36+5:30

उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले

The 'Mahalaxmi' plan was laid down | ‘महालक्ष्मी’ आराखडा निधी रखडलेलाच

‘महालक्ष्मी’ आराखडा निधी रखडलेलाच

Next

कोल्हापूर : अर्थसंकल्पात दोन वर्षांपूर्वी तरतूद केलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर विकास निधीचे दहा कोटी रुपये दोन दिवसांत महापालिकेकडे वर्ग करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठ दिवसांपूर्वी दिले होते. त्यावेळी ‘लक्ष्मी’ पावल्याचे समाधान भक्तांनी व्यक्त केले. मात्र, अद्याप दमडीही महापालिकेच्या खात्यावर जमा न झाल्याने उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरल्याची चर्चा आहे.
अर्थसंकल्पात तरतूद करूनही महापालिका, नगरविकास खाते आणि नियोजन विभाग या तीन विभागांमधील असमन्वयामुळे अडकलेल्या महालक्ष्मी मंदिर विकास निधीचे दहा कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग झाले नव्हते. १४ जुलैला कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर ही गोष्ट महापालिका प्रशासनाने आढावा बैठकीत घातली. पवार यांनी हा निधी तातडीने महापालिकेकडे वर्ग करण्याचे आदेश सचिवांना देत चार दिवसांत निधी वर्ग करण्यात येईल, असे जाहीर केले. अद्याप एक रुपयाही महापालिके च्या खात्यावर वर्ग झालेला नाही. महापालिकेने श्री महालक्ष्मी मंदिर विकासासाठी १९० कोटींचा आराखडा बनविला आहे. श्री महालक्ष्मी मंदिर विकास निधीपैकी दहा कोटी रुपयांची तरतूद सन २०११-१२ च्या अर्थसंकल्पात केली होती. गतवर्षी शासनाने वर्ग केलेला हा निधी महापालिकेने प्रस्ताव पाठवला नाही, म्हणून तो नियोजन विभागाकडून १३ जून २०१३ ला नगरविकास विभागाकडे पुन्हा हस्तांतरित केला. हा निधी उपमुख्यमंत्र्यांच्या दणक्याने पुन्हा महपालिकेला मिळणार आहे. मात्र, अद्याप निधी न मिळाल्याने मंदिर जतन व संवर्धनासाठी ५.२० कोटी, तर दर्शन मंडप उभारणीसाठी ४.८० कोटी रुपयांचे काम रखडणार आहे.

Web Title: The 'Mahalaxmi' plan was laid down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.