आयुक्तांनी कसा सोडवला रेसकोर्सच्या जागेचा वाद? कशी मोकळी झाली 'थीम पार्क'ची वाट?...वाचा इनसाइड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:06 PM2024-02-01T18:06:25+5:302024-02-01T18:11:13+5:30

दक्षिण मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सवर (Mahalaxmi Race Course)  थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

mahalaxmi race course theme park project approved by rwitc chahal believes this development will benefit all mumbaikars | आयुक्तांनी कसा सोडवला रेसकोर्सच्या जागेचा वाद? कशी मोकळी झाली 'थीम पार्क'ची वाट?...वाचा इनसाइड स्टोरी

आयुक्तांनी कसा सोडवला रेसकोर्सच्या जागेचा वाद? कशी मोकळी झाली 'थीम पार्क'ची वाट?...वाचा इनसाइड स्टोरी

मुंबई

दक्षिण मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असणाऱ्या महालक्ष्मी रेसकोर्सवर (Mahalaxmi Race Course)  थीम पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  त्यामुळे आता रेसकोर्सच्या भाडेतत्त्वाचे नूतनीकरण करून २२६ पैकी १२० एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे. रेसकोर्सच्या जागेच्या मुद्द्याला राजकीय वादाचं वळण मिळालं. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिका नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. रेसकोर्सच्या जागेवर थीमपार्क व्हावं याचा पाठपुरावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल करत होते. अखेर चहल यांच्या प्रयत्नांना यश आलं.   

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबची (RWITC) बुधवारी यासंदर्भात ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत १८०० सदस्यांपैकी ७०८  सदस्य उपस्थित होते. ज्यातील ५४० सदस्यांनी पुनर्विकास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं, तर १६८ सदस्यांनी विरोधात मतदान केलं. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता रेसकोर्सच्या भाडेतत्त्वाचं नूतनीकरण करून रेसकोर्सच्या २२६ एकर जागेपैकी १२० एकर जागेवर थीम पार्क उभारता येणार आहे.

मतदान घेऊन आयुक्तांनी बाजी मारली
रेसकोर्सच्या जागेवर थीमपार्कच्या नावाखाली व्यावसायिक बांधकामे आणि खासगी टॉवर होणार असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. यात आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप केले. वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या सदस्यांचं थेट मतदान घेऊन लोकशाही पद्धतीनंच पुर्नविकासावर मोहोर लावली गेली आहे. हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चहल यांनी ही लोकशाही पद्धतीनं मतदान घेऊनच प्रक्रिया पार पाडली गेल्याचं म्हटलं आहे. यासोबतच चहल यांनी त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांनाही उत्तर दिलं आहे. 

आयुक्त आणि मुख्यमंत्री शिंदेंना मोफत क्लबचं सदस्यत्वाची लाच देण्यात आल्याचा आरोप केला गेला. "मी आधीच स्पष्ट केलंय की त्यांनी मला परवानगी दिली नाही तर मी सदस्य होणार नाही. पण सुमारे २० सदस्यांनी स्वत:हून मागणी केली आणि मी सदस्य म्हणून हवा असल्याचं सांगितलं", असं स्पष्टीकरण चहल यांनी दिलं आहे. थीमपार्क व्हावं याबाजूनं सुमारे ७६.२७ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे निर्णय लोकशाही पद्धतीनं घेतला गेला असल्याचंही चहल म्हणाले. याआधी या जागेवर गोल्फकोर्स, हॉटेल आणि कन्वेंशन सेंटर तयार करण्यासाठी RWITC क्लबच्या पॅनलचा दबाव होता. पण चहल यांनी पुढाकार घेऊन थीमपार्कसाठीचा मार्ग मोकळा केला आहे.  

थीमपार्क सर्वसामान्यांसाठी असणार
रेसकोर्सच्या जागेवर उभारण्यात येणारं थीमपार्क हे फक्त सदस्यांसाठी नव्हे, तर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुलं असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचंही चहल यांनी स्पष्ट केलंय. आरडब्ल्डूआयटीसीच्या सर्वसाधारण सभेनंतर आता राज्य सरकार, पालिका आणि रॉयल वेस्टर्स इंडिया टर्फ क्लबमध्ये कायदेशीर करार होताना दिसेल. ज्यात थीम पार्कसाठी १२० एकर तर टर्फ क्लबला ९१ एकर जागेचं वाटप होणार आहे. 

Web Title: mahalaxmi race course theme park project approved by rwitc chahal believes this development will benefit all mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.