Join us

मुंबईत न्यूयॉर्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क, आयुक्त चहल यांनी सांगितला रेसकोर्सवरील प्लान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 5:39 PM

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील जमिनीवर होणाऱ्या थीमपार्कवरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

मुंबई-

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथील जमिनीवर होणाऱ्या थीमपार्कवरुन आरोप-प्रत्यारोप होत असताना आज पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पत्रकार परिषदेत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणत्याही प्रकारचं खासगी बांधकाम होणार नाही. पालिकेला मिळणाऱ्या १२० एकर जागेवर पूर्णपणे उद्यान होईल. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये जसं सेंट्रल पार्क आहे. तसं मुंबई सेंट्रल पार्क तयार केलं जाईल, अशी माहिती चहल यांनी दिली. मुंबई मनपाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेबाबत सध्या जो काही अपप्रचार चालू आहे की तिथं बिल्डर येणार, बांधकाम होणार यात काहीच तथ्य नाही. मी सांगतो त्या जागेवर कोणत्याही खासगी बांधकामाची एक वीटही रचली जाणार नाही. मनपाच्या ताब्यात येणाऱ्या १२० एकर जागेवर फक्त आणि फक्त उद्यानच होईल. ज्या पद्धतीनं अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क आहे, लंडनमध्ये हाइड पार्क आहे. त्यापद्धतीनं मुंबईतही मुंबई सेंट्रल पार्क होईल. जिथं प्रत्येक नागरिकाला विनामूल्य प्रवेश मिळणार", असं आयुक्त चहल यांनी सांगितलं. 

चहल यांनी क्लबच्या सदस्यांना दिलं प्रेझेंटेशनरेसकोर्सवरील क्लबच्या सदस्यांच्या मनातील सगळे गैरसमज दूर करण्यासाठी आणि मुंबईकरांसाठी थीमपार्क व्हावं यासाठी अथक प्रयत्न केल्याचंही चहल यांनी यावेळी सांगितलं. "क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय त्यांच्या हातात नसून सदस्यांच्या हातात असल्याचं सांगितलं तेव्हा मी त्यांना खुली सभा बोलवण्याचं आवाहन केलं. यासभेत मी जवळपास तीन ते साडेतीन तास प्रेझेंटेशन दिलं. रेसकोर्सच्या जागेवर नेमकं काय केलं जाणार याची सविस्तर माहिती दिली आणि त्या जागेचा केवळ आणि केवळ उद्यानासाठीच वापर होईल यासाठी आश्वस्थ केलं. इतकंच नव्हे, तर पालिका आयुक्त म्हणून याची लेखी हमी देण्याचीही तयारी मी दाखवली. सदस्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर दिलं. त्यानंतर क्लबनं मतदान प्रक्रिया राबवून लोकशाही मार्गानेच थीमपार्कसाठीचा निर्णय त्यांनी घेतला", असं चहल म्हणाले.

कोस्टल गार्डन आणि रेसकोर्स गार्डन 'सब-वे'नं जोडणारकोस्टल रोड प्रकल्पामध्ये होणारं गार्डन १७५ एकरांचं असणार आहे. तर रेसकोर्सवर होणारं गार्डन १२० एकरवर होईल हे दोन्ही गार्डन एका अंडरग्राऊंड सब-वेनं जोडलं जाईल. हा सब-वे वाहनांसाठी नसेल तर फक्त मुंबईकरांना यातून चालता येईल अशा उद्देशानं दोन्ही गार्डन जोडले जाऊन जवळपास ३०० एकरावर एक सेंट्रल पार्क मुंबईकरांना उपलब्ध होईल, अशीही माहिती चहल यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका