डहाणू : महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मातेच्या यात्राउत्सवाला ३ एप्रिलपासून सुरूवात होणार असून ही यात्रा पंधरा दिवस सुरू राहणार असल्याने या यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसुविधांबरोबरच कायदा व सुव्यवथा चोख राहावी याचा नियोजनांची सभा डहाणूच्या उपविभागीय अधिकारी अंजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी महालक्ष्मी देवालय ट्रस्ट, सरपंच, उपसरपंच तसेच प्रतिष्ठीत नागरीक व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर चारोटी येथून केवळ ३ कि. मी. अंतरावर विवळवेढे या गावी महालक्ष्मी मातेचे भव्य व ऐतिहासिक मंदिर आहे. पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील लाखो आदिवासींची आदिमाता, जागृत आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी माता गुजरात राज्यातील भाविकांची देखील कुलदेवता आहे. दरवर्षी महाराष्ट्र तसेच गुजरात, मुंबई, पुणे, येथील लाखो भाविक यात्रेदरम्यान येथे सहकुटुंब मुक्कामी येत असतात. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेला सुमारे बारा तेरा लाख भाविक येथे देवीच्या दर्शनाला येत असतात. महालक्ष्मी मातेच्या यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांना पिण्याचे पाणी, शौचालये, शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंधरा दिवस कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी विविध शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली भोसले, तहसीलदार प्रितीलता कौरंथी, कासा पोलीस निरिक्षक रविकांत मगर, महालक्ष्मी ट्रस्टचे शशिकांत ठाकूर, संतोष देशमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तसेच शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, महावितरण कंपनी, पोलीस प्रशासन, मंदिर ट्रस्ट, एस.टी महामंडळ इ. विभागाना विविध सूचना देऊन यात्रेत भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची खबदारी घेण्याचे आदेश देण्यात येऊन संबंधीतांवर वेगवेगळ््या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्यात. ३० मार्च रोजी पुन्हा आढावा बैठक घेऊन प्रत्येक विभागाने काय काम केले याचा आढावा घेण्यात येणार आहे.(वार्ताहर) ४गझनीच्या स्वारीनंतर हे मंदिर तोडण्यात आले. त्यानंतर मोगल साम्राज्याच्या अस्तानंतर पुन्हा मंदिराची उभारणी करण्यात आली. या ऐतिहासिक मंदिराबाबत पुराणातच अनेक आख्यायिका आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबली होती. तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना त्यांनीही येथे मुक्काम केला होता असेही सांगितले जाते. महालक्ष्मी मातेचे मुख्यमंदिर डहाणू स्टेशन पासून १६ कि. मी. अंतरावरील तर मुंबई-अहमदाबाद येथील चारोटी नाक्यापासून चार किलोमीटर म्हणजेच वधना गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तेथे जाण्यासाठी डहाणूतील अनेक दानशूरांनी रस्ताही केला आहेत. ४सालाबादप्रमाणे या वर्षी देखील चैत्रशुद्ध पौर्णिमेला डहाणू येथील महालक्ष्मी मातेच्या भव्य उत्सवाला सुरूवात होते. या यात्रेत मुंबई, पुणे, कोल्हापुर, नाशिक, वसई तसेच गुजरातच्या बलसाड, सुरत, नवसारी, येथील हजारो लहानमोठे दुकानदार येत असल्याने मोठ्या प्रमाणात बाजारपेठ भरत असते. त्यामुळे डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, विक्रमगड, मोखाडा, भागातील लाखो आदिवासी बांधव या यात्रेतून अनेक जीवनावश्यक वस्तू खरेदी करीत असतात.
महालक्ष्मी यात्रा ३ एप्रिलपासून
By admin | Published: March 22, 2015 10:38 PM